कळवा रूग्णालयात औषधे स्वस्त

By Admin | Updated: December 23, 2014 23:11 IST2014-12-23T23:11:21+5:302014-12-23T23:11:21+5:30

मागील तीन वर्षापासून कळवा रुग्णालयात बंद अवस्थेत असलेले मेडीकल स्टोअर्स आता नव्या वर्षात सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

In the hospital, let the drugs cheaper | कळवा रूग्णालयात औषधे स्वस्त

कळवा रूग्णालयात औषधे स्वस्त

ठाणे - मागील तीन वर्षापासून कळवा रुग्णालयात बंद अवस्थेत असलेले मेडीकल स्टोअर्स आता नव्या वर्षात सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार या मेडीकलमधून रुग्णांना औषधांच्या मूळ किमंतीपेक्षा १२.५० टक्के कमी दराने औषधे उपलब्ध होणार आहेत. तसेच रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांच्या चिठ्ठीवर यापुढे रुग्णालयातील डॉक्टरांनी जेनरीक औषधांचा उल्लेख करावा असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे मेडीकलच्या भाड्यापोटी मिळणारी रक्कम ही रुग्णालयासाठी आणि शाळांसाठी उपयोगात आणली जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
कळवा रुग्णालया संदर्भातील विषय मंजुरीसाठी पटलावर आला असतांना मुकुंद केणी यांनी या रुग्णालयातील बंद मेडीकल स्टोअर्सच्या मुद्याला हात घातला. त्यानंतर एका मागून एक नगरसेवकांनी याच मुद्याला धरुन प्रशासनाला अडचणीत आणले. हे मेडीकल केव्हा सुरु होणार, न्यायालयीन प्रक्रियेचे काय झाले, रुग्णांना कमी दरात औषधे उपलब्ध होतील का? असे अनेक प्रश्न उपस्थित करुन सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. निविदा प्राप्त झाल्या असतांना त्या अद्याप उघडण्यात का नाही आल्या?, तसेच या निविदा प्रक्रियेत अनेक किचकट अटी टाकण्यात आल्या आहेत, त्या दूर करुन नव्याने निविदा काढण्यात याव्यात अशी मागणी प्रभारी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी केली. धनदांडग्यांसाठी मेडीकल सुरु न करता, ते सर्वसामान्य गोर गरीब जनतेला उपयोगी ठरले या दृष्टीने रुग्णांना औषधे उपलब्ध करुन द्यावीत अशी मागणीही सदस्यांनी केली. यापुढे येथे रुग्णांना जनेरीक औषधे मिळावीत, या दृष्टीने पालिकेने पावले उचलावीत असे मत नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केले.
दरम्यान या संदर्भात आयुक्त असीम गुप्ता यांनी सांगितले की, मेडीकल संदर्भात निविदा काढण्यात आल्या असून, महिनाकाठी १४.१० लाख पालिकेला मिळणार आहेत. ही रक्कम यापुढे, रुग्णालयासाठी आणि शाळांसाठी वापरण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच डॉक्टरांना देखील रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांच्या चिठ्ठीवर जेनरीक असा उल्लेख करण्यात यावा असे आदेशही त्यांनी दिले. विशेष म्हणजे रुग्णांना या मेडीकलमधून औषधांच्या मुळ किमंतीपेक्षा, १२.५० टक्के कमी दराने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच यापेक्षाही कमी किमतींत औषधे हवी असल्यास त्या प्रकारचा ठराव करता येऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: In the hospital, let the drugs cheaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.