Join us  

कोविड सेंटरची आग रोखणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी व परिचारिकांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 3:38 PM

Fire at covid center : कोविड सेंटरच्या एका मशिनरीला काल दुपारी अचानक आग लागली होती.

मुंबई : दहिसर पश्चिम कांदरपाडा येथील आय.सी.यू. कोविड सेंटरच्या एका मशिनरीला काल दुपारी अचानक आग लागली होती. त्यावेळी उपस्थित डॉक्टर व नर्स यांनी प्रसंगावधान दाखवत सदर आग त्वरित विझवली. तात्काळ आग आटोक्यात आणणाऱ्या स्टाफ नर्स अनुपमा तिवारी, काजल कनोजिया, ममता मिश्रा तसेच डॉ.रवी यादव, डॉ. आकाश कलासकर, व वॉर्डबॉय जतीन यांनी कोविड सेंटरमधील अग्निशमन यंत्रणेचा वापर करुन त्वरित आग आटोक्यात आणली. यावेळी मोठी दुर्घटना टळली. त्यांच्या सतर्कतेमूळे रूग्णांचे जीव ही वाचले. 

या शूरवीरांचा सन्मान शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती डॉ. विनोद घोसाळकर व शिवसेना विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस व आरोग्य समिती अध्यक्षा प्रविणा मोरजकर, प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर यांच्या हस्ते सत्कार आज करण्यात आला. नर्स, डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या या धाडसाचे कौतूक करताना नुकतीच नवरात्रोत्सव साजरा झाला या दिवसात स्त्री सामर्थ्याचा अभूतपूर्व जागर होत असतो. आदिशक्ती म्हणून स्त्रीशक्तीचा कौतुकमिश्रित गौरव आज शिवसेनेतर्फ केल्याचे घोसाळकरांनी सांगितले. तसेच गेले सहा महिने वैद्यकीय कर्मचारी योद्ध्या प्रमाणे काम करीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार केलेल्या उपाययोजनांमुळे आज कोरोना नियंत्रणात आला आहे. कोरोना काळात जीवावर उदार होऊन कार्य करणाऱ्या वैद्यकिय कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे ही शिवसेनेची जबाबदारी आहे असे प्रतिपादन आमदार विलास पोतनीस यांनी केले.  दहिसर कांदरपाडा येथील कोरोना केंद्रातील कर्मचाऱ्यांचे पर्यटनमंत्री, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर व पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनीही कौतुक केले आहे. यावेळी स्थानिक नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे, माजी नगरसेवक, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे, उपविभागप्रमुख विनायक सामंत, शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर, जुडी मेंडोन्सा,युवासेना अधिकारी जितेन परमार व शिवसैनिक उपस्थित होते. 

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्यालॉकडाऊन अनलॉकमुंबई महानगरपालिका