Join us

ज्येष्ठ रिक्षा-टॅक्सी चालकांना सन्माननिधी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 05:40 IST

मंडळासाठी राज्य सरकारने ५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. राज्यात सुमारे दहा लाख रिक्षा-टॅक्सी आहेत.

मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने स्थापन केलेल्या धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळाची गुरुवारी पहिली बैठक झाली. राज्यातील ६५ वर्षांवरील ऑटो रिक्षा- मीटर टॅक्सी चालकांना प्रत्येकी १० हजार रुपये निवृत्ती सन्माननिधी देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. 

निवृत्त सन्मान योजनेंतर्गत सभासद असलेल्या चालकांना सन्मान निधी देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट रिक्षा/टॅक्सी चालक, उत्कृष्ट रिक्षा /टॅक्सी चालक संघटना, उत्कृष्ट रिक्षा स्टॅन्ड यांच्यासाठी आकर्षक बक्षीस योजना दरवर्षी राबवली जाईल, असेही सरनाईक यांनी सांगितले. मंडळाच्या सभासद चालकांसाठी जीवन विमा, अपंग विमा योजना राबविण्याचे विचाराधीन आहे. त्यांच्या मुला-मुलींसाठी शिष्यवृत्ती योजनाही राबवली जाणार आहे. कर्तव्यावर दुखापत झाल्यास चालकाला कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाणार आहे, असेही सरनाईक म्हणाले.

मंडळासाठी राज्य सरकारचे ५० कोटीमंडळासाठी राज्य सरकारने ५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. राज्यात सुमारे दहा लाख रिक्षा-टॅक्सी आहेत. स्वयंरोजगार असलेल्या या क्षेत्रातील चालकांसाठी कल्याणकारी मंडळ आदर्श संस्था म्हणून कार्य करेल. भविष्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे, असे सरनाईक यांनी सांगितले. 

सभासद नोंदणी शुल्क ८०० रुपयेराज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना ५०० रुपये नोंदणी आणि ३०० रुपये वार्षिक वर्गणी असे एकूण ८०० रुपये भरून मंडळाचे सदस्यत्व घेता येईल. मंडळाचे सभासद नोंदणीसाठी संकेत स्थळ (वेबसाईट) निर्माण करण्यात आली आहे. मोबाईलवरूनही अतिशय सुलभ पद्धतीने चालकांना सभासदत्व नोंदणी करता येईल.

टॅग्स :प्रताप सरनाईक