मुंबईच्या उद्योगधंद्यांना हाँगकाँगचे टॉनिक?
By Admin | Updated: January 22, 2015 02:08 IST2015-01-22T02:08:42+5:302015-01-22T02:08:42+5:30
मुंबईतून बाहेर चाललेले उद्योगधंदे वाचविण्यासाठी मुंबई महानगरपालिका विविध परवानग्या सहा दिवसांमध्ये मिळवून देणाऱ्या हाँगकाँग शहरातील पद्धतीचा अभ्यास करणार आहे़

मुंबईच्या उद्योगधंद्यांना हाँगकाँगचे टॉनिक?
मुंबई : मुंबईतून बाहेर चाललेले उद्योगधंदे वाचविण्यासाठी मुंबई महानगरपालिका विविध परवानग्या सहा दिवसांमध्ये मिळवून देणाऱ्या हाँगकाँग शहरातील पद्धतीचा अभ्यास करणार आहे़
देशाच्या आर्थिक राजधानीचा दर्जा मुंबईला देणारे उद्योगधंदेच या नगरीतून गायब होऊ लागल्यामुळे पालिकेने ते वाचविण्यासाठी हातपाय मारण्यास सुरुवात केली आहे़ क्लिष्ट नियम, शेकडो विभागांच्या परवानग्या आणि कर आखणीमुळे अनेक उद्योग व व्यापार मुंबईबाहेर स्थलांतरित होऊ लागले आहेत़ याचा परिणाम पालिकेचा आर्थिक कणा असलेल्या जकात उत्पन्नावर होऊ लागला आहे़ त्यामुळे ही धोक्याची घंटा ओळखून महापालिकेने बिझनेस डेव्हलपमेंट विभाग सुरू करण्याची घोषणा गतवर्षी अर्थसंकल्पातूनच केली़ मात्र सरकारी दिरंगाईत रखडलेला हा विभाग तीन महिन्यांपूर्वी सुरू झाला़ या विभागाच्या कार्यपद्धतीचे सादरीकरण स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी करण्यात आले़
या विभागाने केलेल्या पाहणीत एखाद्या उद्योगासाठी विविध प्रकारच्या १३२ परवानग्या लागतात़ यापैकी ४५ परवानग्या पालिकेकडूनच घ्याव्या लागत आहेत़ अशा क्लिष्ट नियमांमध्ये शिथिलता आणण्याची मागणी कॉर्पोरेट क्षेत्राकडून या विभागाकडे आली आहे़ परवानगीची प्रक्रिया सुटसुटीत व सोपी कशी करता येईल, यावर अभ्यास सुरू आहे़ यासाठी प्रगतीपथावर असलेल्या हाँगकाँग शहरातील जलद परवानगी पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी पालिकेचे पथक पाठविण्याची मनीषा अतिरिक्त आयुक्त एस़ व्ही़ श्रीनिवास यांनी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)
बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांकडे बहुतांशी व्यवसाय सरकले आहेत़ उद्योगधंदे नसल्याने दुबईसारख्या शहरांमध्ये सहा दिवस राबवून वीकेण्डला विश्रांतीसाठी मुंबईत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे़ त्यामुळे हे शहर रिटायरमेंट (निवृत्त) होत नाही ना, अशी भीती या सादरीकरणातून व्यक्त करण्यात आली़
परवान्यांचे नूतनीकरण आॅनलाइन : दरवर्षी एक लाख परवान्यांचे नूतनीकरण होत असते़ एवढ्या अर्जांची छाननी व कागदपत्रे तपासणे हे पालिका व त्या उद्योगांसाठीही वेळखाऊ व क्लिष्ट काम असते़ त्यामुळे ही प्रक्रियाच आॅनलाइन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे़ त्यानुसार परवानेही मोबाइल अॅपद्वारे आॅनलाइन मिळणार आहेत़
व्यापार व शहराच्या विकासासाठी़़़ मुंबईत कोणत्या व्यापारासाठी पोषक वातावरण आहे, याचा अभ्यास मार्केटिंग कक्ष करणार आहे़ त्यानुसार इच्छुक गुंतवणुकदार आणि खाजगी व्यावसायिक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्यात येईल़