Join us  

राजकीय नेत्यांवर ‘हनी ट्रॅप’! नवाब मलिकांना क्लिन चीट; मुंडेंवर टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 6:01 AM

धनंजय मुंडे प्रकरणाला वेगळे वळण; भाजप नेत्याचा ‘त्या’ महिलेवर आरोप

ठळक मुद्देमनसे नेताही ‘ती’च्या विराेधात पुढे आला

मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी कायम; आराेप गंभीर - पवारांचे सूचक विधान

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेच्या विरोधात भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी पोलिसांकडे  धाव घेतल्याने गुरुवारी या ‘हाय प्रोफाईल’ प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. रेणू शर्मा नावाच्या महिलेने मलाही जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता, असे पत्र हेगडे यांनी अंबोली पोलिसांना दिले आहे. 

दरम्यान, याच महिलेने मनसे नेते मनीष धुरी व जेट एअरवेजचे अधिकारी रिझवान कुरेशी यांनाही ‘हनी ट्रॅप’मध्ये ओढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे. या नव्या घडामोडींमुळे धनंजय मुंडे यांना राजकीय  जीवदान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला. आरोपाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांनीदेखील मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असल्याचे सांगत त्यांच्या मंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य केल्याने मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. मात्र संध्याकाळी भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी अंबोली पोलीस ठाण्यात जाऊन त्या महिलेविरोधात ‘हनी ट्रॅप’ची तक्रार दिल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. भाजप आणि मनसेच्या नेत्यांनादेखील त्या महिलेने जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आल्याने आता मुंडे यांचा राजीनामा मागणाऱ्या भाजप नेत्यांची पंचाईत झाली आहे. 

प्रदेशाध्यांनी केली पाठराखणराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे आणि नवाब मलिक या दोन सहकारी मंत्र्यांची पाठराखण केली. जावयावर आरोप झाले म्हणून सासऱ्याचा राजीनामा मागणे योग्य होणार नाही. तसेच मुंडे यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पोलीस तपासात काय निष्पन्न होते ते बघून निर्णय घेतला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.  

पाेलिस सहकार्य करीत नसल्याचा वकिलाचा आराेप धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेचा शुक्रवारी डी. एन. नगर येथील एसीपी कार्यालयात अर्धवट जबाब नोंदवण्यात आला, तर उर्वरित जबाब शुक्रवारी नोंदविला जाणार आहे. यात मुंडे यांचाही जबाब नोंदवून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. गेले चार दिवस ओशिवरा पोलिसांकडे तक्रार नोंदवून घेण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. मात्र, कोणतीही दखल घेण्यात आली नाही. चाैकशीत ताटकळत ठेवल्याचा आरोप तक्रारदार महिलेचे वकील रमेश त्रिपाठी यांनी केला आहे. 

विमान कंपनीचा अधिकारीही जाळ्यात नामांकित विमान कंपनीत मोठ्या पदावर असलेल्या रिझवान कुरेशी यांच्यावरही शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप ‘त्या’ महिलेने केला होता. कुरेशी यांच्या विरोधातही अंबोली पोलिसांत १५ एप्रिल, २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिलेच्या वकिलावरही विनयभंगाचा गुन्हानवी मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेच्या वकिलावरदेखील विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. या वकिलाच्या नवी मुंबई येथील एपीएमसीमधील कार्यालयात २०१८ साली हा प्रकार घडला होता. या प्रकरणात वकील रमेश त्रिपाठीने अटकपूर्व जामीन घेतलेला आहे.  

नवाब मलिकांना क्लिन चीट; मुंडेंवर टांगती तलवारn धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. मुंडे काल मला स्वत: भेटले. यावेळी त्यांनी प्रकरणाची संपूर्ण माहिती मला दिली. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून यावर लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, त्यात फारसा विलंब होणार नाही, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पत्रकारांना सांगितले. n त्याचबरोबर मंत्री नवाब मलिक यांच्यावर थेट नव्हे तर त्यांच्या नातेवाईकांवर आरोप झाल्याचे सांगत मलिक यांना पवारांनी क्लीन चिट दिली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीचे सत्र दिवसभर सुरू होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आदी नेते या बैठकांना उपस्थित होते. n धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप झाल्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यायचा की, पोलीस तपास पूर्ण होऊपर्यंत वाट पाहायची, यावर खल झाल्याचे समजते. 

मलाही जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न : कृष्णा हेगडेरेणू शर्मा नावाच्या महिलेने मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी गुरुवारी केला. याप्रकरणी त्यांनी अंबोली पोलिसांना एक पत्र दिले असून, पाेलीस त्यातील सत्य पडताळून पाहत आहेत.हेगडे यांनी शर्मावर आमिषाने भुलवणे, हनी ट्रॅप, ब्लॅकमेल आणि खंडणी वसुलीसारखे गंभीर आरोप केले आहेत.  ‘२०१० पासून रेणू शर्मा सतत कॉल आणि मेसेज करून रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या. मी नकार देऊनही त्यांनी २०१५ पर्यंत मला त्रास देणे सुरूच ठेवले.  माझ्यावर पाळतही ठेवली होती. त्या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले तसेच त्यांची बाहेरून चौकशी केली. ज्यात शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींनाही फसवल्याची माहिती मला मिळाली. त्यानुसार मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी’, असे हेगडे यांनी नमूद केले आहे. 

... तर माझाही मुंडे झाला असता : मनीष धुरीरेणू शर्मा यांनी आपल्यालाही जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप अंधेरी पश्चिमचे मनसे विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांनी केला. मी त्या जाळ्यात फसलो असतो तर २००८ - ०९ मध्येच माझा धनंजय मुंडे झाला असता. पण, माझे नशीब चांगले म्हणून मी वाचलो. उच्चभ्रू लोकांना जाळ्यात ओढायचे आणि ब्लॅकमेल करायचे, अशी सवयच या मंडळींना आहे, असा आरोप करतानाच अंबोली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करणार असल्याचेही धुरी यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :धनंजय मुंडेनवाब मलिकशरद पवार