प्रामाणिक शिवसैनिकांची पुन्हा निराशा
By Admin | Updated: May 6, 2015 00:41 IST2015-05-06T00:38:52+5:302015-05-06T00:41:12+5:30
महापालिका निवडणुकीपासून शिवसेनेमध्ये सुरू झालेली नाराजी अद्याप कायम आहे. स्वीकृत नगरसेवकपदासाठीही निष्ठावंतांना डावलून आयत्यावेळी संघटनेत आलेल्यांना स्थान देण्यात आले आहे.

प्रामाणिक शिवसैनिकांची पुन्हा निराशा
नवी मुंबई : महापालिका निवडणुकीपासून शिवसेनेमध्ये सुरू झालेली नाराजी अद्याप कायम आहे. स्वीकृत नगरसेवकपदासाठीही निष्ठावंतांना डावलून आयत्यावेळी संघटनेत आलेल्यांना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे नेत्यांच्या कार्यप्रणालीविषयी असंतोष वाढला आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या मतांची टक्केवारी राष्ट्रवादीपेक्षा वाढली होती. यामुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये सत्ता मिळेल, असे वातावरण निर्माण झाले होते. पक्षाच्या नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. परंतु नंतर संघटनेमधील वाद वाढत गेले. विजय चौगुले व विजय नाहटा अशा दोन गटांत संघटना विभागली गेली. महापालिकेच्या तिकीटवाटपातही जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जाऊ लागले. यामुळे संघटनेतील मतभेद विकोपास जाऊ लागले. निवडणुकीसाठी भाजपासोबत युती जाहीर केली व अनेक निष्ठावंत शिवसैनिकांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागले. यामुळे ४० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली. त्याचा फटका बसून शिवसेनेस सत्तेपासून दूर राहावे लागले. उपनेते विजय नाहटा व इतर नेत्यांनाही शिवसैनिक दोष देऊ लागले. स्वीकृत नगरसेवकपदासाठी तरी प्रामाणिक व निष्ठावंत शिवसैनिकांना संधी मिळेल व काही प्रमाणात अन्याय दूर होईल, अशी अपेक्षा होती. परंतु या सदस्य निवडीमध्येही निष्ठावंतांची प्रचंड निराशा झाली.
शिवसेनेने राजेश शिंदे यांना स्वीकृत सदस्यपदासाठी उमेदवारी दिली आहे. वास्तविक शिंदे २००५ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. २०१० च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी आरपीआयमध्ये प्रवेश केला होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली होती. आयत्यावेळी संघटनेत आलेले असताना त्यांना स्वीकृत सदस्यपदासाठी उमेदवारी दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. कोपरखैरणेमध्ये राजेंद्र आव्हाड यांनी कोपरखैरणे प्रभाग ४९ मधून बंडखोरी केली होती. परंतु ठाणे जिल्ह्णाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केल्यानंतर त्यांनी अधिकृत उमेदवारांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली आहे. ते चांगले कार्यकर्ते असल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु शहरातील पदाधिकाऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. ज्या प्रभागात एक नगरसेवक आहे, त्याच प्रभागात दुसरा नगरसेवक कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. नेत्यांच्या निवडीविषयी नाराजी व्यक्त होत आहे.
संघटनेसाठी काम करणाऱ्यांची निराशा
शिवसेनेला नेरूळ पूर्व, सीवूड व वाशी परिसरात समाधानकारक यश मिळालेले नाही. या परिसरातील कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक केल्यास त्याचा फायदा संघटनेसाठी होऊ शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. ज्यांनी मागील पाच ते दहा वर्षे प्रामाणिकपणे काम केले अशा कार्यकर्त्यांना संधी दिली जावी, अशी मागणी होत होती. परंतु नेत्यांनी प्रामाणिक कार्यकर्त्यांना पुन्हा कात्रजचा घाट दाखविला असल्यामुळे नाराजी वाढली आहे.