घरबसल्या गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र!
By Admin | Updated: June 19, 2015 02:56 IST2015-06-19T02:56:54+5:302015-06-19T02:56:54+5:30
मुंबई विद्यापीठात गुरूवारी कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांच्या हस्ते अॅकॅडमिक डिपॉझिटरीचा (शैक्षणिक सुरक्षा ठेव) शुभारंभ करण्यात आला.

घरबसल्या गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र!
मुंबई : मुंबई विद्यापीठात गुरूवारी कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांच्या हस्ते अॅकॅडमिक डिपॉझिटरीचा (शैक्षणिक सुरक्षा ठेव) शुभारंभ करण्यात आला. यापुढे गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र डीमॅट अकाऊंटप्रमाणे आॅनलाईन अकाऊंटवर उपलब्ध होणार आहेत. अशा प्रकारचा उपक्रम सुरू करणारे मुंबई विद्यापीठ देशातील पहिलेच विद्यापीठ आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दस्ताऐवज अधिक सुरक्षित होणार आहेत. शिवाय विद्यार्थ्यांना घरबसल्या मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपवर तत्काळ डाऊनलोड करता येतील. तूर्तास विद्यापीठाकडून २०१४ या शैेक्षणिक वर्षाचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर द्वितीय सत्राच्या जाहीर होणाऱ्या निकालाच्या गुणपत्रिका उपलब्ध होतील. येत्या शैक्षणिक वर्षापासून पूर्णत: या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.,
आत्तापर्यंत गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र कागदावर उपलब्ध करून दिले जात होते. तीच शैक्षणिक कागदपत्रे संबंधित शैक्षणिक संस्थेमार्फत दिलेल्या कागदपत्रांशी पडताळणी करून खातरजमा करण्यात येत होती. मात्र त्यामुळे गैरप्रकार होण्याची शक्यता बळावली होती. यापुढे याचे प्रमाण कमी होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
कशी वापराल अॅकॅडमिक डिपॉझिटरी?
शैक्षणिक कागदपत्रे डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना एक
लिंक उपलब्ध करून देईल. त्यावर लॉग इन आणि पासवर्ड दिला जाईल. त्याच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे डाऊनलोड करता येतील. या पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकांवर २५६ बीट इनस्क्रीप्टेड डिजीटल स्वाक्षरी असेल.