Join us

मुंबईत होम क्वारंटाईन कालावधी आता ७ दिवसांचा, डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा? वाचा नवी नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 22:36 IST

Mumbai Corona Updates: सहव्याधी असले तरी लक्षणविरहित अथवा सौम्य लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घरात उपचार घेता येणार आहे. तसेच पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सातव्या दिवशी व सलग तीन दिवस ताप नसल्यास या रुग्णांचा होम क्वारंटाईन कालावधी संपणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - सहव्याधी असले तरी लक्षणविरहित अथवा सौम्य लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घरात उपचार घेता येणार आहे. तसेच पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सातव्या दिवशी व सलग तीन दिवस ताप नसल्यास या रुग्णांचा होम क्वारंटाईन कालावधी संपणार आहे. लसीकरण पूर्ण झालेला व्यक्ती कोविड प्रतिबंधक नियम पाळून २४ तास या रुग्णांची काळजी घेऊ शकणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या संदर्भातील सुधारित परिपत्रक गुरुवारी रात्री पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.

मुंबईत दररोज २० टक्के कोविड रुग्ण वाढत आहेत. मात्र  यामध्ये लक्षणविरहित रुग्णांची संख्या ९० टक्के असल्याने केवळ पाच टक्केच रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. त्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या सध्या ८० हजारांच्या आसपास असली तरी यापैकी पाच हजार रुग्णालयात दाखल आहेत. तर लक्षणे नसलेली, सौम्य लक्षणे अथवा अति जोखमीच्या गटातील असे सुमारे तीन लाख ३२ हजार नागरिक होम क्वारंटाईन आहेत. अशा रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत पालिकेने मार्गदर्शन केले आहे.

कधी संपेल क्वारंटाईन कालावधी...सदर रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर किमान सातव्या दिवशी व सलग तीन दिवस ताप येत नसल्यास व त्यापुढेही त्यांनी मास्क लावून ठेवल्यास त्यांचा विलगीकरण कालावधी पूर्ण होणार आहे. अशावेळी त्यांना पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही. तसेच अति जोखमीच्या गटातील व्यक्तींची विलगीकरण कालावधीही सात दिवसांनी पूर्ण होणार आहे. मात्र या कालावधीत त्यांच्यामध्ये कोणती लक्षणे आढळून आल्यास पाचव्या व सातव्या दिवशी त्यांना चाचणी करावी लागणार आहे.

तर त्वरित घ्या डॉक्टरचा सल्ला...* तीन दिवस सलग १०० अंश ताप असलास.* श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यास.*ऑक्सिजनचे प्रमाण ९३ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास ( एका तासांच्या अंतराने सलग तीनवेळा तपासणी केल्यास)* सतत छातीमध्ये दुखत असल्यास.* रुग्णाचा मानसिक तणाव वाढल्यास, अति थकवा जाणवल्यास.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईमुंबई महानगरपालिका