Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरचे राजकारण सांभाळता आले नाही!- आशा भोसले;  ‘ऐ मेरे वतन के लोगो’वरून लतादीदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 08:15 IST

मला माझ्या घरचे राजकारण सांभाळता आले नाही, असा टोला प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गाण्यावरून लता मंगेशकर यांना लगावला.

मुंबई : मला माझ्या घरचे राजकारण सांभाळता आले नाही, असा टोला प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गाण्यावरून लता मंगेशकर यांना लगावला.विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात बुधवारी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम झाला. त्यात मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली.संगीतकार सी. रामचंद्र यांच्या आत्मचरित्रात आशा भोसले यांच्याकडून या गाण्याची तालीम करून घेतल्याचा तपशील आहे.

नंतर आयत्यावेळी ते गाणे लतादीदींनी गायले, असे त्यांनी नोंदवून ठेवले आहे. हे गाणे नेहरूंनी ऐकले आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. ते गाणे अजरामर झाले; पण तेव्हापासून ते गाणे आशातार्इंचे की आयत्यावेळी ते सादर करणाऱ्या लतादीदींचे, असा मुद्दा चर्चेत आहे. त्याचा संदर्भ देत हे गाणे नेमके कुणाचे, अशी विचारणा गाडगीळ यांनी केल्यावर ‘काही गोष्टी देण्यात आनंद असतो, घेण्यात नाही,’ असा टोला आशातार्इंनी लगावला. त्याला जोडून जेव्हा गाडगीळ यांनी त्यांना राजकारणाविषयी प्रश्न केला, तेव्हा आशातार्इंनी, ‘मला माझ्याच घरातले राजकारण सांभाळता आले नाही’, अशी वेदना मांडली.

या मुलाखतीत आशाताईंनी यशापयशाचे अनेक तपशील उलगडले. तसेच लतादीदी आणि सुधीर फडके यांची खुमासदार नक्कलही करून दाखवली.

टॅग्स :आशा भोसलेलता मंगेशकर