Join us  

एसआरए प्रकल्पातील घर खरेदीधारक आता बेघर होणार नाही; 50 लाख नागरिकांना मिळाला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 6:27 PM

घर नावावर होण्याचा कालावधी आता होणार ५ वर्षे 

मुंबई: आपल्या कष्टाच्या पैशांनी मुंबई आणि ठाण्यातील गोरगरिबांनी एसआरए  प्रकल्पात मूळ मालकांकडून घरे खरेदी केली आहे.एसआरए मार्फत ज्या लोकांना घरं मिळाली आहेत. मात्र आज १० वर्षानंतरही त्यांच्या नावावर घर होत नाही. पैसे भरूनही त्यांना स्वतःच्या मालकी हक्काचे घर मिळत नाही. यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. एसआरए प्रकल्पात घरे घेतलेली ५० लाखांपेक्षा जास्त लोकं आता बेघर होण्याच्या मार्गावर आहेत.याबाबत मागाठाणे येथील शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे सदर महत्वाची बाब गृहनिर्माण मंत्र्याच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.

यावेळी एसआरए प्रकल्पात घेतलेले घर खरेदीधारकांच्या नावे असलेला पूर्वीचा कालावधी 10 वर्षां ऐवजी 5 वर्षे करावा,तसेच रेडी रेकनर प्रमाणे दंडाची रक्कम १० टक्के ऐवजी ठराविक कमी रक्कम घेऊन घरे त्यांच्या नावावर करावी अशी आग्रही मागणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे केली अशी माहिती आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली.

सदर घर खरेदी धारकांपैकी कोणीही बेघर होणार नाही, तसेच घर नावावर होण्याचा पूर्वीचा कालावधी कमी करून आता ५ वर्षे करणार असे ठोस आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.त्यामुळे मुंबई ठाण्यातील 50 लाख एसआरए खरेदीधारक बेघर होणार नसून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अशी माहिती आमदार सुर्वे यांनी  दिली.

रेडी रेकनर प्रमाणे १० टक्के रक्कम ही घर खरेदीधारकांना शासनाला द्यावी लागणार. तरच शासन त्यांची घरे ही मग खरेदी करणाऱ्यांच्या नावे करणार आहेत.मात्र ही सदर 10 टक्के रक्कम घर खरेदी धारकांना भरणे कठीण आहे.त्यामुळ ठराविक कमी रक्कम घेऊन घरे त्यांच्या नावावर करावी अशी आग्रही मागणी देखिल आमदार सुर्वे यांनी मंत्री महोदयांना केली आहे.

टॅग्स :प्रकाश सुर्वेमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार