बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. मतदारांना आपला हक्क बजावता यावा, यासाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग आणि उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांनी याबाबतचा अध्यादेश काढले आहेत. या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यांसाठी 'दक्षता पथक' स्थापन केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुटी लागू राहील. तसेच महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदार जर शहराबाहेर कार्यरत असतील, तरी त्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही सार्वजनिक सुटी लागू राहणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या अध्यादेशात नमूद आहे.
कोणाला सुट्टी देणे बंधनकारक असणार?
उद्योग आणि कामगार विभागानेदेखील सार्वजनिक सुटीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे काढले आहेत. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खासगी कंपन्यांतील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स , रिटेलर्स यांना सार्वजनिक सुटी लागू असेल.
सुट्टी देणे शक्य नसेल, तर काय?
अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगारांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत द्यावी, असे अध्यादेशात नमूद आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांनी मतदानाच्यादिवशी सुटी किंवा सवलत न दिल्यास दुकाने व आस्थापना खात्यामार्फत कार्यवाही करण्यात येते. यासाठी मुंबई शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे यांसाठी दक्षता पथक नेमण्यात आले आहेत. नागरिकांनी ९१२२-३१५३३१८७ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
लोकशाही प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटीचा निर्णय घेण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी कामाच्या कारणाने मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मतदारांनी सक्रियपणे मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी केले आहे.
Web Summary : Mumbai announces a public holiday on January 15th for municipal elections. Government, businesses must grant a holiday or two-hour voting break. Violators will face action.
Web Summary : मुंबई में नगरपालिका चुनावों के लिए 15 जनवरी को सार्वजनिक अवकाश घोषित किया गया है। सरकार, व्यवसायों को छुट्टी या दो घंटे का मतदान अवकाश देना होगा। उल्लंघन करने वालों पर कार्रवाई की जाएगी।