होळीचा सण लय भारी...
By Admin | Updated: March 6, 2015 23:12 IST2015-03-06T23:12:20+5:302015-03-06T23:12:20+5:30
धुलिवंदनानिमित्त सर्वत्र जल्लोष दिसून आला. विविध रंगांची उधळण करण्यात लहान मोठे सर्वजण सहभागी झाले होते. अनेक टोळ्या पोसत (फगवा) मागण्यासाठी फिरताना दिसल्या.

होळीचा सण लय भारी...
धुलिवंदनानिमित्त सर्वत्र जल्लोष दिसून आला. विविध रंगांची उधळण करण्यात लहान मोठे सर्वजण सहभागी झाले होते. अनेक टोळ्या पोसत (फगवा) मागण्यासाठी फिरताना दिसल्या. मुली-महिला देखील रंग लावण्यात मागे नव्हत्या. शहरात धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासून बच्चेकंपनी वर्षभर ज्याची वाट पहात होते ती धुळवड. आदल्याच दिवशी विविध प्रकारच्या पिचकाऱ्या, रंग घेण्यात आल्या. शहराच्या विविध चौकात रत्यारस्त्यात बालगोपाळ येणाऱ्या जाणाऱ्यांना भिजवू लागल्याने दुपारपासून रस्ते ओस पडले, दुकानदार दुकाने बंद करून बालगोपाळांच्या उत्साहात स्वत:हून सहभागी झाले. डीजेच्या तालावर नाचणाऱ्यांकडून होणारी रंगांची मनसोक्त उधळण पहावयास मिळत होती. वर्ल्डकपमध्ये आज भारत विरुद्ध वेस्टइंडीज सामना असल्याने तरुणांचा सहभाग घटल्याचे पहावयास मिळाले. तलासरी भागात गावागावात भरणाऱ्या आठवडे बाजारालाही या मंदीचा फटका बसला असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
पारंपरीकतेला आधुनिकतेचा साज
वाडा : तालुक्यात सर्वत्र होळीकोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अनेक गावांमधून पारंपारीक पद्धतीने होळी साजरी झाली तर काही गावांमधून विविध संदेश देणारी होळी लावण्यात आली. वाडा शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात प्लॅस्टीक व प्रदूषणमुक्तीचा संदेश देणारी होळी साजरी झाली. या वेळी नाट्यकलाकार हृषीकेश सावंत यांनी स्वच्छ सुंदर पर्यावरण विषयक नाट्यछटा सादर करून पारंपारीक होळीचा आधार घेत समाज जागृतीचा संदेश दिला.
होळीसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते म्हणूनच वृक्ष लागवडीचा संदेश देणारी पर्यावरणपूरक होळी आम्ही सालाबादप्रमाणे साजरी करतो अशी माहिती होळी उत्सव समितीचे अॅड. अविनाश भोईर व संतोष तांबोळी यांनी दिली. तालुक्यातील चिखले गावात एक गाव एक होळी ही पन्नास वर्षाची परंपरा जोपासत मोठ्या उत्साहात होळी पेटवण्यात आली. गावातील सर्व जाती-पातीच्या जनतेने नटून सजून होळीच्या भोवती जमून पारंपारीक वाद्याच्या गजरात होळीची महाआरती केली. एकता व समता यांचा संदेश देणाऱ्या या उत्सवात जुन्या परंपरांना तिलांजली देऊन होळीला आधुनिकतेचा साज चढवला.
पारोळ : वसईच्या शहरी व ग्रामीण परिसरात होळीचा उत्सव पारंपरीक पद्धतीने साजरा झाला. सकाळपासूनच धामधूम सुरू होती. वसई पश्चिम पट्ट्यात सुपारीच्या होळीच्या मिरवणुका पाहायला मिळत होत्या. तर ग्रामीण भागातील नागरीक होळीला लागणाऱ्या लाकडासाठी जंगलात गेले होते. ग्रामीण भागात नवदापत्य होळीच्या सभोवताली पाच फेरे मारून होळीमातेकडून आशीर्वादही घेतात.
होळीमातेने भक्तप्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत प्रवेश केला होता. त्या अग्नीतून भक्त प्रल्हाद सुखरूप बाहेर आला होता त्यामुळे ग्रामीण भागात होळीच्या खांबाच्या टोकाला भक्त प्रल्हादाचे प्रतिक म्हणून कोंबडीचे पिल्लू बांधले जाते.
होळीच्या उत्सवात या भागात आकर्षण असते ते वेगवेगळ्या काढलेल्या सोंगांची. नागरीक व लहान मुले वेगवेगळ्या वेशभूषा करून पोसद (पैसे) मागत फिरतात व आनंदाने शिमगोत्सव साजरा करतात. आजही या शिमगोत्सवाच्या माध्यमातून सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन होलीत्सव साजरा करतात. यामुळे या सणाच्या माध्यमातून समाज एकीकरणाचे दर्शन होते.