Join us

डौलानं तिरंगा फडकवा, पण आधी नियम जाणून घ्या; अवमान झाल्यास काय होती कारवाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 11:40 IST

स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकारने देशात हर घर तिरंगा अभियान सुरू केले आहे. राष्ट्रीय ध्वजाबद्दलचा आदर, जाणीव आणि देशभक्तीची भावना अधिक बळकट करणे, हा त्यामागील उद्देश आहे.

मुंबई

स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकारने देशात हर घर तिरंगा अभियान सुरू केले आहे. राष्ट्रीय ध्वजाबद्दलचा आदर, जाणीव आणि देशभक्तीची भावना अधिक बळकट करणे, हा त्यामागील उद्देश आहे. यामुळे ध्वज वापरण्याचे नियम, घडी घालण्याची पद्धत याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढली आहे. मात्र, यात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी तिरंगा फडकवण्याचे, उतरवण्याचे व जतन करण्याचे नियम जाणून घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान राखून त्याची योग्य काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. 

हर घर तिरंगा अभियान१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशात शाळा, शासकीय कार्यालये, संस्था तर नागरिकांची घरे, कार्यालय, दुकानावर तिरंगा फडकवला जातो. नागरिकांनी ध्वज खरेदी करुन लावावा. त्याची योग्य निगा राखावी व भारतीय ध्वज संहितानुसार त्याचा सन्मान करावा. जनतेत राष्ट्रध्वजाबद्दलचा अभिमान व आदराची भावना वाढवणे हा यामागील हेतू आहे. 

ध्वज कुठे मिळेल?स्थानिक बाजारपेठ, पोस्ट ऑफिस, शासकीय मान्यताप्राप्त विक्रेते, ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स मान्यताप्राप्तच ध्वज विकत घ्यावा. 

राष्ट्रध्वजाचा अवमान केल्यास कारवाईराष्ट्रीय  सन्मान कायदा १९७१ अंतर्गत ध्वजाचा अपमान हा गुन्हा असून त्यासाठी ३ वर्षांपर्यंत कारावास व दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 

ध्वजाची घडी घालण्याचे नियमप्रथम हिरवा पट्टा वर ठेवून घडी घाला. त्यावर पांढरा व मग केशरी पट्टा येईल. शेवटी अशोकचक्र दिसेल अशी घडी घ्या. 

अशी घ्यावी काळजी ध्वज स्वच्छ व अखंड ठेवा. फाटलेला किंवा मळलेला ध्वज वापरू नये. कोरड्या व स्वच्छ ठिकाणी ठेवावा. तिरंग्याच्या दांड्यावर इतर कोणतीही गोष्ट नसाव्यात. फुले, पताका, जाहिराती किंवा इतर सजावट तिरंग्याच्या दांड्यावर असू नये केवळ राष्ट्रध्वजच असावा. 

तिरंगा फडकवण्याचे, उतरण्याचे नियम काय?1. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच फडकवावा.2. तिरंग्यात केशरी रंग वर, पांढरा मध्ये आणि हिरवा खाली असावा. 3. ध्वज जमिनीला, पाण्याला वा जमिनीवर खेचू नये. 4. इतर कोणताही ध्वज तिरंग्याच्या वर नसावा.

टॅग्स :राष्ट्रध्वजमुंबई