Join us  

एड्सग्रस्त वेश्येचा व्यवसाय समाजास धोकादायक- सत्र न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 7:33 AM

पीडितेला दोन वर्षे सुधारगृहात ठेवण्याचा आदेश

मुंबई : एचआयव्हीग्रस्त असलेल्या वेश्या व्यवसायातील पीडितेची प्रकृती पाहता, तिला समाजात वावरू दिले, तर ती समाजसाठी धोकादायक ठरू शकते, असे म्हणत अतिरिक्त सत्र न्यायालयाने तिला दोन वर्षे सुधारगृहात ठेवण्याचा आदेश दिला. सुधारगृहात पीडितेची काळजी घेण्यात येईल व तिला संरक्षणही मिळेल. तिला समज दिल्यावर ती पुन्हा सामान्य आयुष्य जगू शकेल, असे न्यायालयाने म्हटले.पीडितेला एचआयव्ही झाला आहे, यात वाद नाही. तिने कोणाशी शारीरिक संबंध ठेवल्यास त्याचे संक्रमण होऊ शकते. त्यामुळे पीडितेला मोकळे सोडल्यास ते समाजासाठी धोकादायक ठरू शकते. दंडाधिकारी न्यायालयाने संबंधित कायद्याअंतर्गत पीडितेला दोन वर्षे सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले. या आदेशाला तिच्या वडिलांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले. संबंधित पीडितेला गैरसमजातून व तिला एचआयव्ही झाल्याने अटक करण्यात आली. मुलगी अभिनेत्री असून, मुलीचे वडील पोलीस अधिकारी आहेत. घरची स्थिती उत्तम आहे. ते तिला सांभाळू शकतात, असा युक्तिवाद मुलीच्या वडिलांच्या वकिलांनी केला. सरकारी वकिलांनी यावर आक्षेप घेतला. मुलीला रंगेहात पकडण्यात आले. तिला सुधारगृहात तिला व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले, असे सरकारी वकिलांनी सांगितले. पीडितेने अन्य कोणाशी शारीरिक संबंध ठेवल्यास या रोगाचे संक्रमण होऊ शकते. त्यामुळे तिचा समाजाला धोका नाही, असा पीडितेच्या वकिलांचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला.काय म्हणाले न्यायालय? पीडितेची काळजी आणि संरक्षण दोन्हीही सुधारगृहात केले जाऊ शकते. दंडाधिकाऱ्यांनी मुलीचे पुनर्वसन व्हावे, यासाठी तिला सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले. तिचे समुपदेशन केल्यानंतर ती सामान्य आयुष्य जगू शकते, असे न्यायालय म्हणाले.

टॅग्स :मुंबई हायकोर्टएड्स