मोटरसायकलची पिकअपला धडक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:19 IST2020-11-22T09:19:11+5:302020-11-22T09:19:11+5:30
- भरधाव वेगाने गाडी चालवणे बेतले जीवावर \Sसुधारीत कॉपी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर भरधाव येणारी ...

मोटरसायकलची पिकअपला धडक !
- भरधाव वेगाने गाडी चालवणे बेतले जीवावर
\Sसुधारीत कॉपी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर भरधाव येणारी मोटरसायकल पिकअपला धडकली. या अपघातात बापलेकाचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही घटना घडली असून याप्रकरणी खेरवाडी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
श्रीमुनी काशी माळी (८०) आणि रवी श्रीमुनी माळी (३१) अशी मृतांची नावे असून ते दोघे बापलेक आहेत. मालाड पूर्वच्या शिवाजीनगर परिसरात ते राहत होते. शनिवारी सकाळी ते काही फुले आणण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्ग मालाडवरून दादरच्या दिशेने निघाले होते. भरधाव निघालेली ही मोटरसायकल सांताक्रुझ पूर्वच्या वाकोला ब्रिजवर येताच रवीचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती जाऊन जवळच उभ्या असलेल्या पार्किंगमधील पिकअपला जाऊन धडकली, जो कोणतेही सुरक्षेचे चिन्ह न देता उभा करण्यात आला होता. या अपघातात रवी हा गाडीवरून खाली कोसळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर त्याचे वडील श्रीमुनी हे गाडीवरून उंच उडून मागून येणाऱ्या कारच्या खाली चिरडले. या दोघांना गंभीर अवस्थेत शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास हा प्रकार घडला असून त्यांचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर खोलम यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, याप्रकरणी पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.