Join us  

कुलाब्यात वस्त्रकलेचा ऐतिहासिक ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 10:07 AM

एनजीएमए कला दालनात विशेष प्रदर्शन

मुंबई :कुलाबा येथील नॅशनल गॅलरी ऑफ माॅडर्न आर्ट या कला दालनात वस्त्रकलेची परंपरा, हातमाग आणि देशोदेशीच्या स्थानिक कलाकारांची वस्त्रकलेची शैली उलगडणारे ‘सूत्र संतती’ हे विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून वस्त्रकलेचे टप्पे उलगडत जातात, एकाच वेळी पूर्वीच्या वस्त्रकलेचा ऐतिहासिक ठेवा आणि त्याचे बदलते स्वरूप यांची सांगड घालण्यात कलाकारांना यश आले आहे. नॅशनल गॅलरी ऑफ माॅडर्न आर्ट या कला दालनात आयोजित हे प्रदर्शन सोमवार वगळता ७ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते ६ या वेळेत खुले राहणार आहे. शिंजीनी कुलकर्णी आणि अंजली चंदक या कलाकारांनी मिळून वस्त्रकलेच्या अनोख्या पैलूंना कला रसिकांसमोर मांडले आहे. 

या प्रदर्शनाची खासियत म्हणजे या ठिकाणी एकाच वेळी देशातील विविध राज्यांची परंपरा असलेल्या प्राचीन साड्या मांडण्यात आल्या आहेत.

काळासोबतच एकाच वेळी वस्त्रकला घराघरातील कपाटातून थेट संग्रहालयाच्या दारात कशी पोहोचते, याचा आगळावेगळा अनुभव या ठिकाणी घेता येणार आहे.

१२५ साड्या प्रदर्शनात :

 देशभरातील २०० हून अधिक कलाकारांनी मेहनत घेऊन या ठिकाणी १२५ साड्या प्रदर्शित केल्या आहेत.  जामदानी, पटोला, बनारसी, पैठी, काथा, कांजीवरम अशा एक ना अनेक साड्या या प्रदर्शनात आहेत, त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या साड्या वर्षानुवर्षे जतन करण्यात आलेल्या आहेत. शिवाय, या साड्यांवरील विशिष्ट नक्षीकाम, रंग, पोत ही सर्व माहिती प्रदर्शनात उलगडण्यात आली आहे.  वस्त्रकलेचे धडे गिरवणाऱ्या विद्यार्थी, अभ्यासक आणि संशोधकांसाठी हे प्रदर्शन पर्वणी आहे.  या प्रदर्शनाची संकल्पना व मांडणीकार स्वतः कला रसिकांसाठी ‘वाॅक थ्रू’ करून वस्त्रकलेचे पैलू उलगडताना दिसतात.

टॅग्स :कुलाबा