संयुक्त संसदीय समितीपुढे विद्यार्थ्यांची ऐतिहासिक साक्ष

By Admin | Updated: June 18, 2015 02:33 IST2015-06-18T02:33:20+5:302015-06-18T02:33:20+5:30

देशाच्या संसदीय इतिहासात संयुक्त संसदीय समितीपुढे साक्ष देणारे वयाने सर्वात लहान भारतीय अशी मानाची नोंद कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या

Historical testimony of students before the Joint Parliamentary Committee | संयुक्त संसदीय समितीपुढे विद्यार्थ्यांची ऐतिहासिक साक्ष

संयुक्त संसदीय समितीपुढे विद्यार्थ्यांची ऐतिहासिक साक्ष

मुंबई : देशाच्या संसदीय इतिहासात संयुक्त संसदीय समितीपुढे साक्ष देणारे वयाने सर्वात लहान भारतीय अशी मानाची नोंद कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या मुंबईतील दोघा विद्यार्थ्यांच्या नावापुढे झाली आहे. भूमी अधिग्रहण व पुनर्वसन विधेयकाच्या चिकित्सेसाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीपुढे नवी दिल्ली येथे जाऊन शार्दूल कुलकर्णी व आदित्य मनुबरवाला यांनी साक्ष दिली. ‘प्रवीण गांधी कॉलेज आॅफ लॉ’चे विद्यार्थी असलेला आदित्य १९ वर्षांचा तर शार्दूल १८ वर्षांचा आहे.
सध्या देशभर भूमी अधिग्रहण व पुनर्वसन सुधारणा विधेयक चर्चेत आहे. या विधेयकाबाबत विचार करण्यासाठी खासदार एस. एस. अहलुवालिया यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात या समितीने जनतेकडून सूचना मागविल्या होत्या. सूचना/सुधारणा पाठविणाऱ्यांपैकी निवडक नागरिकांना व सामाजिक संस्थांना समितीने साक्ष देण्यासाठी आमंत्रित केले होते. शार्दूल व आदित्य यांनीही कायद्याचे विद्यार्थी या दृष्टिकोनातून सदर विधेयकाबाबत संयुक्तपणे सूचना पाठविल्या होत्या. त्या दोघांनाही समितीने साक्षीसाठी निमंत्रण पाठवून सुमारे २० मिनिटे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
एस. एस. अहलुवालिया, शरद पवार, दिग्विजय सिंह, जयराम रमेश, शरद यादव, सलीम मोहंमद यासारखे दिग्गज खासदार सदस्य असलेल्या समितीपुढे साक्ष देण्याची संधी या दोघा विद्यार्थ्यांना मिळाली. संसदीय इतिहासात संयुक्त संसदीय समितीने साक्षीसाठी निमंत्रण दिलेले ते वयाने सर्वात लहान भारतीय आहेत. आपल्या सूचनांचा समिती अहवालात समावेश केला जाईल, अशी आशा या दोघांनी व्यक्त केली.
उन्हाळी सुटीतील अभ्यास प्रकल्पासाठी शार्दूल कुलकर्णी व आदित्य मनुबरवाला नवी दिल्लीत गेले होते. संसदीय विधीविषयक कामकाजाबद्दल अभ्यास करताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही त्यांनी भेट घेतली होती. या काळातच सदर विधेयकाचा अभ्यास करून
त्यांनी समितीला सूचना सादर
केल्या होत्या.

‘लोकमत’च्या ऋणात
संसदीय समितीकडे सूचना पाठविताना समितीचे अध्यक्ष एस. एस. अहलुवालिया यांना लिहिलेल्या पत्रात शार्दूल आणि आदित्य यांनी ‘लोकमत’चा आवर्जून उल्लेख केला आहे. कायद्याचे विद्यार्थी म्हणून या द्वयीने महिला फेरीवाल्यांच्या अनुषंगाने फेरीवाला कायद्यावर लिहिलेला लेख ‘लोकमत टाइम्स’ने यंदाच्या महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्चला प्रसिद्ध केला होता. त्याचा संदर्भ या दोघांनी स्मरणपूर्वक दिला आहे.

Web Title: Historical testimony of students before the Joint Parliamentary Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.