स्थानकावर उपनगराची ऐतिहासिक माहिती असावी - राज्यपाल
By Admin | Updated: December 22, 2015 00:53 IST2015-12-22T00:53:27+5:302015-12-22T00:53:27+5:30
मुंबई शहराला तसेच येथील प्रत्येक उपनगराला स्वतंत्र रंजक इतिहास आहे. मात्र देशभरातून येऊन नव्याने स्थायिक झालेल्या लोकांना या इतिहासाची माहिती नाही

स्थानकावर उपनगराची ऐतिहासिक माहिती असावी - राज्यपाल
मुंबई : मुंबई शहराला तसेच येथील प्रत्येक उपनगराला स्वतंत्र रंजक इतिहास आहे. मात्र देशभरातून येऊन नव्याने स्थायिक झालेल्या लोकांना या इतिहासाची माहिती नाही. या सर्व लोकांना मुंबईशी जोडण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये शहराबद्दल आपुलकीची भावना निर्माण करण्यासाठी मुंबईतील प्रत्येक उपनगरीय रेल्वे स्थानकावर संबंधित उपनगराची ऐतिहासिक माहिती सांगणारे शिलालेख ठेवावेत, अशी सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली.
या शिलालेखांवर उपनगरातील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, गुहा, किल्ले यांसह तेथे राहून गेलेल्या नामवंत व्यक्तींबाबत थोडक्यात माहिती असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. १६व्या पार्ले महोत्सवाचे उद्घाटन रविवारी विलेपार्ले येथील वामन मंगेश दुभाषी मैदानावर राज्यपालांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
पार्ले महोत्सवासारख्या कला, क्रीडा व साहित्याला चालना देणाऱ्या महोत्सवांमधून सामाजिक सलोखा वाढीला लागून राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत होते, असे सांगतानाच लोक-कलाकार व आदिवासी कलाकार यांना सहभागी करून घेऊन ‘पार्ले महोत्सव’ आंतरराष्ट्रीय पातळीचा करावा, अशीही सूचना राज्यपालांनी या वेळी केली.
यंदाच्या पार्ले महोत्सवात
३० हजार स्पर्धक ४१ विविध क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये भाग घेणार असल्याचे आमदार पराग अळवणी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)