ऐतिहासिक वांद्रे स्थानकाचे रूपडे पालटणार
By Admin | Updated: June 27, 2015 01:36 IST2015-06-27T01:36:47+5:302015-06-27T01:36:47+5:30
हेरिटेज दर्जा असलेल्या वांद्रे स्थानकाचा युनेस्कोच्या (संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था) साहाय्याने विकास करण्याचा निर्णय घेण्यात

ऐतिहासिक वांद्रे स्थानकाचे रूपडे पालटणार
मुंबई : हेरिटेज दर्जा असलेल्या वांद्रे स्थानकाचा युनेस्कोच्या (संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था) साहाय्याने विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि युनेस्को यांच्यात शुक्रवारी वांद्रे येथे सामंजस्य करार करण्यात आला. याचवेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सीएसटी आणि खार या स्थानकात वायफाय सुविधा देण्याची घोषणा केली. यामुळे मोबाइलवर इंटरनेट सुविधा असणाऱ्या प्रवाशांना त्याचा फायदा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वांद्रे स्थानकाची सुरुवात २८ नोव्हेंबर १८६४ रोजी झाली. त्यानंतर २४ वर्षांनी म्हणजेच १८८८ साली वांद्रे स्थानक इमारत बांधण्यात आली. हेरिटेज दर्जा असलेल्या वांद्रे स्थानकात गेल्या काही वर्षांत प्रवाशांची संख्या वाढली आहे. हे पाहता या स्थानकाचा आता युनेस्कोच्या साहाय्याने विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी रेल्वे मंत्रालय आणि युनेस्को यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (हेरिटेज) मनू गोयल, रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद आणि भारतातील युनेस्कोचे संचालक शिगेरु आओयागी उपस्थित होते. युनेस्कोकडून साधारण तीन महिन्यांत एक अहवाल तयार केला जाईल आणि यामधून स्थानकाचा विकास करण्यासाठी काही सूचना केल्या जातील, असे मनू गोयल यांनी सांगितले. या अहवालातच स्थानकात कशा आणि कोणत्या सुविधा दिल्या पाहिजे, त्यासाठी खर्च कोणता आदी बाबी स्पष्ट केल्या जातील, अशी माहिती गोयल यांनी दिली. (प्रतिनिधी)