Join us

लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 08:14 IST

भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने होणाऱ्या प्रगतीवर होणार चर्चा : जागतिक पातळीवरील मान्यवरांचा असेल सहभाग

मुंबई: 'लोकमत'च्या वतीने यंदा १८ ऑगस्ट रोजी लंडनच्या ऐतिहासिक भूमीत 'ग्लोबल इकॉनामिक कन्व्हेन्शन'चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठित सोहळ्याचे हे दूसरे वर्ष असून, गेल्या वर्षी हा सोहळा सिंगापूर येथे झाला होता. या वर्षी लंडनमध्ये होणाऱ्या या कन्व्हेन्शनमध्ये भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने होणाऱ्या प्रगतीवर चर्चा होणार आहे. भारताच्या आर्थिक धोरणांचे विश्लेषण, जागतिक व्यापारातील भूमिका, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांचा विकास आणि हरित ऊर्जा यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.

या कन्व्हेन्शनमध्ये चार परिसंवाद होणार असून, जागतिक स्तरावरील ख्यातनाम मान्यवर त्यात सहभागी होणार आहेत. त्यासोबतच आपल्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे.

परिसंवादात अर्थव्यवस्था, उद्योग, तंत्रज्ञान, पर्यावरण, शिक्षण आणि सामाजिक, राजकीय अशा विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. या चर्चासत्रांमध्ये जगभरातील तज्ज्ञ, विचारवंत आणि नेते आपली मते आणि अनुभव मांडणार आहेत. डिजिटल अर्थव्यवस्था आणि स्टार्टअप इकोसिस्टमच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक क्षमतांचा आढावा घेतला जाईल. जागतिक पातळीवरील उद्योजक आणि नेते एकत्र येऊन भारताच्या आर्थिक भवितव्यासंदर्भात नवे दृष्टिकोन मांडतील.

परिसंवादातून उमटणार परिवर्तनाचे विचार

जागतिक स्तरावरील प्रख्यात उद्योजक, धोरणकर्ते आणि नेते एकत्र येऊन भारताच्या आर्थिक भवितव्यासाठी नवे दृष्टिकोन मांडतील. भारताच्या आर्थिक धोरणांमधील सुधारणा, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती यावर मंथन होईल. स्टार्टअप इकोसिस्टिमच्या माध्यमातून भारतातील उद्योजकतेची वाढ आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या संधी यांचाही सविस्तर विचार होईल. 'लोकमत ग्लोबल इकॉनामिक कन्व्हेन्शन'मधील परिसंवाद भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी नव्या कल्पना आणि प्रेरणा देणारे ठरतील. यामुळे भारताच्या जागतिक अर्थव्यवस्थेतील स्थानाला बळकटी मिळेल आणि परिवर्तनाच्या विचारांना गती प्राप्त होईल.

पाच पुरस्कारांनी होणार गौरव

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे मान्यवरांना प्रदान करण्यात येणारे पुरस्कार, कोहिनूर ऑफ इंडिया, भारत भूषण, महाराष्ट्र रत्न, ग्लोबल सखी आणि गुजरात रत्न अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. हे पुरस्कार त्यांच्या कार्याची जागतिक पातळीवर दखल घेण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी दिले जाणार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना जागतिक पटलावर सन्मानित करण्यात येणार आहे.

लंडनमध्येच 'ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'का ? 

लंडन हे जागतिक स्तरावरील महत्त्वाचे आर्थिक केंद्र मानले जाते. येथून आंतरराष्ट्रीय व्यापार, गुंतवणूक आणि धोरणात्मक संवाद घडतो. त्यामुळेच लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन' सारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी लंडनची निवड केली. भारताच्या आर्थिक वाटचालीला जागतिक व्यासपीठावर प्रभावीपणे मांडण्यासाठी लंडन हे ठिकाण महत्त्वाचे आहे. या शहराचे भारताशी जुने नाते आहे.

पहिले पर्व : सिंगापूरमध्ये दिला होता आर्थिक विकासाचा नारा जागतिक स्तरावरील पहिले 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन' गेल्या वर्षी सिंगापूरमधील पंचतारांकित हॉटेल शांग्रिलामध्ये २८ मार्च २०२४ रोजी पार पडले. यात जागतिक अर्थव्यवस्था, रोजगारनिर्मिती, आंतरराष्ट्रीय वित्त, बैंकिंग, पायाभूत सुविधा, पर्यटन, स्टेम सेल्स, टेक्सटाइल, फार्मास्युटिकल्स, आणि हॉस्पिटॅलिटी यावर चर्चा झाली. भारताला आपली अर्थव्यवस्था अधिक समावेशक आणि शाश्वत बनवण्यासाठी उद्योग तसेच स्टार्टअप्सना चालना देणे आवश्यक आहे.

जागतिक पातळीवर माध्यम समूहाद्वारे होणारे 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन' हे देशाच्या एकंदरीत विकासासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. परिसंवाद, विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे विचार, चर्चा, यामुळे भारताच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून हे अनोखे पाऊल आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय वित्तव्यवस्था, बैंकिंग, शाश्वत विकासाचा सांस्कृतिक वारसा, पायाभूत सुविधा, पर्यटन, बांधकाम क्षेत्र यांची पायाभरणी यातून नक्कीच होईल- अभय भुतडा, प्रसिद्ध उद्योजक 

टॅग्स :लंडनदेवेंद्र फडणवीसनितीन गडकरी