Join us

ऐतिहासिक गिरगाव चौपाटी ‘लेझर शो’ने उजळणार; महापुरुषांचा जीवनपट उलगडला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 09:40 IST

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर सुरू होणारा हा पहिला लेझर शो असेल.

मुंबई : गिरगाव चौपाटीचे ऐतिहासिक महत्त्व आहेच! या ठिकाणी  मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. आगामी काळात चौपाटीवर पर्यटकांचा ओघ आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. महापुरुषांची   जीवनगाथा उलगडवून दाखविणारा लेझर शो चौपाटीवर लवकरच सुरू होणार आहे. २२ जानेवारी अयोध्येत राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्याच दिवशी चौपाटीवर लेझर शोचे उद्घाटन होईल.  मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर सुरू होणारा हा पहिला लेझर शो असेल.

अशा प्रकारचे लेझर शो अन्य चौपाट्यांवरही आयोजित केले जाणार आहेत. मुंबई महापालिका हा प्रकल्प राबवीत आहे. हे लेझर शो ८-८ मिनिटांचे असतील. त्या माध्यमातून महापुरुषांच्या  जीवनपटाची ओळख करून देण्यात येईल. लेझर शो सायंकाळी सहा ते रात्री अकरा या वेळेत दाखविला जाईल. श्रीरामाचा जीवनपटही  यात असेल. ही  संकल्पना मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची आहे. 

चौपाटीवरील उद्यानात येण्यासाठी दोन अतिरिक्त प्रवेशद्वारे उभारण्यात येणार आहेत.  त्यामुळे लोकांना लेझर शो पाहण्यासाठी प्रवेश सुकर होईल.  चौपाटीवरील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ या लेझर शो संदर्भात संपूर्ण माहिती मिळेल. लेझर शोसाठी पालिका चार कोटी रुपये  खर्च करणार आहे. 

पर्यटक वाढणार :

चौपाटीवर येणाऱ्या पर्यटकांसाठी अन्य काही पाहण्यासारखे नाही. मरिन ड्राइव्ह ते गिरगाव चौपाटी या तीन किमीच्या पट्ट्यात मोठी गर्दी असते. चौपाटीवर लेझर शो आयोजित केल्याने लोकांना नवीन काही पाहता येईल. जास्तीत जास्त पर्यटक चौपाटीवर यावेत यासाठी पालिकेने चौपाटीवरील जुन्या उद्यानाचे नूतनीकरण केले आहे. 

टॅग्स :मुंबई