Join us

हिरानंदानी बिल्डर्सकडे २० कोटींची खंडणी मागणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 06:39 IST

पवईतील प्रसिद्ध हिरानंदानी बिल्डरकडून २० कोटींची खंडणी मागणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्याला पोलिसांनी बुधवारी अटक केली. गुलाब विठ्ठल पारखे असे आरोपीचे नाव आहे.

मुंबई : पवईतील प्रसिद्ध हिरानंदानी बिल्डरकडून २० कोटींची खंडणी मागणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्याला पोलिसांनी बुधवारी अटक केली. गुलाब विठ्ठल पारखे असे आरोपीचे नाव आहे.पुणे जिल्ह्यातील निमगाव तर्फे म्हाळुंगे (ता. जुन्नर) येथील रहिवासी असलेला पारखे हिरानंदानीकडे २७ वर्षे काम करायचा. याच्याकडे जिल्हाधिकारी, महानगरपालिका व अन्य कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी होती. नोव्हेंबर २०१६ मध्ये त्याने राजीनामा दिला होता. त्यानंतर जुन्नरमधील सावरगाव-ढालेवाडी गटातून शिवसेनेतर्फे जि. प. सदस्य झाला.दीड वर्षापासून तो कंपनीच्या बांधकामांबाबत हरकती घेत होता.कंपनीच्या अधिकाºयाने १२ नोव्हेंबर रोजी त्याची गावी भेट घेतली. निवडणुकीसाठी खूप खर्च झाल्याचे सांगत त्याने २० कोटींची खंडणी मागितली. तडजोडीअंती ६ कोटी देण्याचे ठरले.पहिला हप्ता म्हणून १० जानेवारीला १० लाख रुपयेदेण्यात आले. त्याचे हिरानंदानी कंपनीने रेकॉर्डिंग केले. बुधवारी पारखे १ कोटीचा दुसरा हप्ता घेण्यासाठी येणार होता. त्यापूर्वीच कंपनीच्या वतीने कर्मचारी अर्जुन घायतडके यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांना त्याला खंडणी घेताना अटक केली.

टॅग्स :पैसा