हिरानंदानी बिल्डर्सने शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने

By Admin | Updated: February 5, 2015 02:14 IST2015-02-05T02:14:20+5:302015-02-05T02:14:20+5:30

शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी घेण्यात आलेल्या बैठकीला हिरानंदानी बिल्डर्सचे स्वरूप रेवणकर यांनी दांडी मारली.

Hiranandani builders get rid of farmers' mouths | हिरानंदानी बिल्डर्सने शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने

हिरानंदानी बिल्डर्सने शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने

आविष्कार देसाई - अलिबाग
शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी घेण्यात आलेल्या बैठकीला हिरानंदानी बिल्डर्सचे स्वरूप रेवणकर यांनी दांडी मारली. तर नागाव ग्रामपंचायतीचे काही पदाधिकारी हे गाडीतच बसून होते. हिरानंदानी बिल्डर्सने तोंडाला पाने पुसल्याने शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
हिरानंदानी यांच्या ‘डायनॉमिक व्हेकेशन’ कंपनीने नागाव येथे मोठ्या प्रमाणात भराव केल्याने स्थानिकांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी बुधवारी नागाव ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक आणि कंपनीच्या वतीने स्वरूप रेवणकर उपस्थित राहणार होते. मात्र रेवणकर यांनी या बैठकीला दांडी मारली. त्यांच्या ऐवजी एक व्यक्ती आली होती. ‘ती’ व्यक्ती कोण आहे, याची कल्पना नागावचे ग्रामसेवक गोपाल ठाकूर यांनाही बैठकीच्या वेळी नव्हती. शेतकऱ्यांचे प्रश्न मी येत्या आठ दिवसांत सोडवतो, शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही, असे आश्वासन ‘त्या’ व्यक्तीने दिले.
कंपनीच्या वतीने बोलणारे तुम्ही कोण अशी विचारणा शेतकऱ्यांनी केली असता. कंपनीने मला बैठकीला पाठल्याचे ‘त्यांनी’ सांगितले. शेकऱ्यांनी रेवणकर यांच्याबाबत विचारणा केली असता, ते कामानिमित्त बाहेर असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी आलेल्या
व्यक्तीकडे अधिकृत पत्राबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याची माहिती शेतकरी उदय पाटील, दिलीप भोईर यांनी दिली. यावेळी न्याय मिळविण्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
शेतीच्या नुकसानीची पाहणी करून भरपाईबाबत विचारणा करण्यात येईल, अशी अपेक्षा असताना आजच्या बैठकीत याबाबतीत काहीच झाले नाही, अशी प्रतिक्रिया संतप्त शेतकऱ्यांनी नोंदवली.

भरावामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी शेतकरी उन्हात फिरून करत होते. त्याचवेळी नागाव ग्रामपंचायतीचे सदस्य मात्र गाडीत बसले होते, असे प्रितेश घरत यांनी सांगितले. हिरानंदानी बिल्डर्स आणि नागाव ग्रामपंचायत यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार नसल्याचे दिसते, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

मला या बैठकीची माहिती होती. परंतू अचानक कामानिमित्त बाहेर जावे लागले. माझ्या वतीने बैठकीला कंपनीचे कोणते प्रतिनिधी गेले, याची कल्पना मला नाही.
- स्वरूप रेवणकर, संचालक

Web Title: Hiranandani builders get rid of farmers' mouths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.