Join us  

शैक्षणिक दिनदर्शिकेतून हिंदी वगळले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 6:21 PM

हिंदी विषय शिक्षकांनी विचारले विद्यार्थी हिंदीचे स्वयंअध्ययन करणार कसे ?

दिनदर्शिकेच्या पुनर्र्चनेची मागणी

मुंबई : पुढील काही काळात शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचा ऑनलाईन , ऑफलाईन अभ्यास करताना कोणता पाठ वाचावा ? कशाचा अभ्यास करावा याचा गोंधळ होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यासाठी शैक्षणिक दिनदर्शिका तयार केली आहे. पहिली ते दहावी सर्व विद्यार्थ्यांना विषय निहाय ऑगस्टपर्यंत अभ्यासल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची गोडी लागावी आणि ऑनलाईन शिक्षण घेताना याचा अभ्यास अभ्यास करावा या उद्देशाने ही मार्गदर्शिका विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे.  मात्र या दिनदर्शिकेत इतर सर्व विषयांप्रमाणे हिंदी विषयाचा समावेश न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हिंदी विषय शिक्षकांनी याबद्दल नाराजी ही व्यक्त केली आहे.एससीईआरटीने तयार केलेल्या दिनदर्शिकेमध्ये प्रत्येक इयत्तेनुसार जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यात विषयनिहाय पाठांचे अध्ययन मुलांनी कसे करावे ? शिक्षक आणि पालकांनी कशी मदत करायची ? त्यांना मार्गदर्शन कसे करावे याच्या सूचना दिल्या आहेत. ही दिनदर्शिका  एससीईआरटीच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे निश्चितच विद्यार्थी स्वयंअध्ययन करू शकणार आहेत. विद्यार्थ्यांनी हिंदी विषयाचे स्वयं अध्ययन करू नये का ? शाळा सुरु होईपर्यंत हिंदी विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी कसा करायचा असे प्रश्न हिंदी विषय शिक्षकांनी उपस्थित केले आहेत. या दिनदर्शिकेच्या सहाय्याने विद्यार्थी आणि शिक्षक स्वतःच्या वेळेनुसार व सवडीनुसार शिक्षण घेऊ शकणार आहेत. यातील स्वयं अध्ययन पूरक साहित्य, कृती , स्वाध्याय यांचा  वापर करून पालक, विद्यार्थी व शिक्षक पुढील काही महिने शाळा सुरु होईपर्यंत शिक्षण प्रक्रिया सुरु राहणार आहे. अशावेळी यात हिंदीचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केलानाही तर त्या विषयाचा अभ्यासक्रम त्यांनी कसा पूर्ण करून घ्यायचा असाही प्रश्न शिक्षकांनी विचारला आहे.मराठी , इंग्रजी प्रमाणे पाचवी ते दहावी इयत्तामध्ये गुण संपादनासाठी हिंदी विषयाला ही तितकेच महत्त्व आहे. राज्यातील अनेक शैक्षणिक ग्रुप्सवर  एससीईआरटीकडून हिंदी विषयाचा समावेश दिनदर्शिकेत न केल्याने बरीच चर्चा सुरु असल्याची माहिती हंसराज मोरारजी पब्लिक स्कुलचे शिक्षक उदय नरे यांनी दिली.  हिंदी अध्यापक ग्रुप, हिंदी अध्यापक महाराष्ट्र, हिंदी शिक्षक या सारख्या अनेक हिंदी विषय शिकणार्‍या शिक्षकांनी शैक्षणिक दिनदर्शिकेत हिंदी विषय समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे परिषदेने या शैक्षणिक दिनदर्शिकेची पुनर्र्चना करावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एससीईआरटीचे संचालक दिनकर पाटील यांना पत्र लिहून मागणी केली आहे.

टॅग्स :हिंदीशिक्षणशिक्षण क्षेत्र