Join us  

Himanshu Roy: आठवड्यापूर्वी मित्रांना घरी बोलावून हिमांशू रॉय म्हणाले होते...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 2:02 PM

आठवड्याभरापूर्वीच हिंमाशू रॉय यांनी नातेवाईक आणि मित्रांना भेटायला बोलावलं होतं

मुंबई: राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येनं अनेकांना धक्का बसला आहे. कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रॉय यांनी शुक्रवारी दुपारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. यामुळे हिंमाशू रॉय यांचे नातेवाईक आणि मित्र यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र हिमांशू रॉय यांच्या आयुष्यातील गेल्या आठवड्याभरातील घटनांवर नजर टाकल्यास आत्महत्येचा विचार त्यांच्या डोक्यात होता, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रॉय यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी गेल्याच आठवड्यात त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांना भेटायला बोलावलं होतं. 'मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि तुम्हा सगळ्यांची गळाभेट घेण्याची माझी इच्छा आहे,' असं त्यावेळी रॉय यांनी म्हटलं होतं. रॉय यांनी मृत्यूपूर्वी सहा ओळींची एक चिठ्ठी लिहिली. यामध्ये त्यांनी कर्करोगाविरुद्धच्या त्यांच्या लढ्याचा उल्लेख केला आहे. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरलं जाऊ नये, असंही त्यांनी या चिठ्ठीत लिहिलं आहे. हिमांशू रॉय यांनी ज्यावेळी स्वत:वर गोळी झाडली, त्यावेळी त्यांनी पत्नी भावना लिव्हिंग रुममध्ये होती. एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, हिमांशू रॉय खुर्चीवर बसले आणि त्यांनी रिव्हॉल्वरमधून स्वत:वर गोळी झाडली. यानंतर त्यांच्या पत्नीनं वाहन चालकाच्या मदतीनं बॉम्बे हॉस्पिटल गाठलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेची माहिती दुपारी 1 वाजता मिळाल्याचं कफ परेड पोलिसांनी सांगितलं. हिमांशू रॉय यांच्याबद्दल बोलताना त्यांचे मित्र आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक भावूक झाले. 'हिमांशू कर्करोगाविरोधात मोठ्या हिमतीनं लढा देत होता. त्यामुळे त्यानं आत्महत्या केली, यावर विश्वास बसत नाही. हिंमाशू माझा खूप चांगला मित्र होता. फिटनेस हा त्याचा आवडता विषय होता. हिंमाशू कुलाब्यामध्ये लहानाचा मोठा झाला. मात्र त्याच्या आडनावामुळे तो अनेकांना पश्चिम बंगालचा वाटायचा. प्रत्येक प्रकरणाचा हिंमाशूनं मोठ्या बारकाईनं तपास केला. अतिशय मोठा राजकीय दबाव असतानाही त्यांनी पल्लवी पुरकायस्थ आणि पत्रकार जे. डे. हत्या प्रकरणांचा तपास केला. काम करताना मोठा दबाव असतानाही त्याचा चेहरा कायम आनंदी असायचा. तीन महिन्यांपूर्वीच आम्ही भेटलो होतो,' अशा शब्दांमध्ये पटनायक यांनी हिंमाशू रॉय यांच्या आठवणी सांगितल्या.  

टॅग्स :हिमांशू रॉयआत्महत्या