जुहू येथील अपहृत चिमुरडीची सुटका
By Admin | Updated: March 22, 2015 00:23 IST2015-03-22T00:23:04+5:302015-03-22T00:23:04+5:30
गेल्या आठवड्यात जुहू चौपाटीहून अपहृत झालेल्या तीन महिन्यांच्या चिमुरडीची देवनार पोलिसांनी सहिसलामत सुटका केली. तसेच तिचे अपहरण करणाऱ्या दाम्पत्यासह तिघांना बेड्याही ठोकल्या.

जुहू येथील अपहृत चिमुरडीची सुटका
मुंबई : गेल्या आठवड्यात जुहू चौपाटीहून अपहृत झालेल्या तीन महिन्यांच्या चिमुरडीची देवनार पोलिसांनी सहिसलामत सुटका केली. तसेच तिचे अपहरण करणाऱ्या दाम्पत्यासह तिघांना बेड्याही ठोकल्या. चौकशीत लग्नाला १५ वर्षे लोटूनही मूल होत नसल्याने हा गुन्हा केल्याची कबुली दाम्पत्याने दिली.
गोवंडीच्या झाकिर हुसेन नगरात जैबून शेख (३१) ही विवाहिता पलक या तिच्या तीन महिन्यांच्या मुलीसह राहते. याच परिसरात राहणाऱ्या शहनाज शेख या महिलेने जैबूनची भेट घेऊन पलकला दत्तक घेण्याबाबत चौकशी केली. जैबूनने त्यास नकार दिला. मात्र शहनाजने पलक आम्हाला दे, असा हट्ट धरला. जैबूनचा नकार कायम असल्याने शहनाजने तिच्यासोबत मैत्री केली. १७ फेब्रुवारीला शहनाजने जैबून व पलकला जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी नेले. तेथे जैबूनला भेळ आणण्यासाठी धाडून शहनाज पलकला घेऊन पसार झाली. भेळ घेऊन परतलेली जैबून पलकला शोधू लागली. पलकचे अपहरण शहनाजनेच केल्याचे तिच्या लक्षात आले. तिने तशी तक्रार विलेपार्ले पोलीस ठाण्यात दिली. तेथे गुन्हा नोंद झाला आणि तपासासाठी देवनार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुनीरखान इनामदार यांनी या मुलीचा शोध सुरू केला. साहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, आंबरंगे, भगत, मेगावळे या पथकाने सीसीटीव्ही चित्रण, शहनाजच्या मोबाइल रेकॉर्डवरून तिचा पती वाहिद याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला.