महामार्ग सीमांकनासाठी मुहूर्त निघाला
By Admin | Updated: June 30, 2015 01:20 IST2015-06-30T01:20:23+5:302015-06-30T01:20:23+5:30
पळस्पे-इंदापूर महामार्गाच्या रुंदीकरणामध्ये बाधित गावांना भूसंपादनाचा योग्य मोबदला द्यावा व प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी गावकऱ्यांनी २५ जून रोजी रास्ता रोकोचा इशारा दिला होता.

महामार्ग सीमांकनासाठी मुहूर्त निघाला
पनवेल : पळस्पे-इंदापूर महामार्गाच्या रुंदीकरणामध्ये बाधित गावांना भूसंपादनाचा योग्य मोबदला द्यावा व प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी गावकऱ्यांनी २५ जून रोजी रास्ता रोकोचा इशारा दिला होता. प्रशासनाने गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. सोमवारी सीमांकनाला सुरुवात झाली.
महामार्गाच्या रुंदीकरणासाठी २००९ मध्ये भूसंपादनाच्या नोटिसा काढण्यात आल्या. मात्र आजपर्यंत जागेचे सीमांकन न झाल्यामुळे भूधारक, घरमालक यांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. आपले घर रस्त्यात जात असल्याच्या भीतीपोटी गेल्या सहा वर्षांपासून लोक आपल्या घरांची डागडुजी न करताच घरात राहतात. त्यांचे घर तुटणार आहे की नाही हेच त्यांना माहीत नसल्याने ही परिस्थिती उद्भवली होती. मागील सहा वर्षांपासून हा प्रश्न याच प्रकारे प्रलंबित ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या २५ जूनला मुंबई - गोवा महामार्ग प्रकल्पग्रस्तांनी रास्ता रोकोचा इशारा दिल्यानंतर भूसंपादन अधिकाऱ्यांनी सोमवारी पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे, महामार्ग प्राधिकरण अभियंता अभिषेक अग्रवाल, कृषी विस्तार अधिकारी व्ही. पाटील आदींनी उपस्थित राहून तारा गावाजवळ सीमांकनाची प्रक्रि या सुरू केली. (प्रतिनिधी )