जाहिरातींचा ‘राज्यमार्ग’
By Admin | Updated: December 23, 2014 22:39 IST2014-12-23T22:39:33+5:302014-12-23T22:39:33+5:30
खोपोली - पेण राज्य मार्गावर अनधिकृतरीत्या जाहिरातींचे अनेक होर्र्डिंग उभारण्यात आले आहेत.

जाहिरातींचा ‘राज्यमार्ग’
खालापूर : खोपोली - पेण राज्य मार्गावर अनधिकृतरीत्या जाहिरातींचे अनेक होर्र्डिंग उभारण्यात आले आहेत. त्यामुळे चालकाचे लक्ष विचलित होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या गंभीर बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह अन्य प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
महामार्गाशेजारी असणारी जमीन सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा रस्ते विकास मंडळाच्या अखत्यारीत असल्याने त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम अथवा जाहिरातीसाठीचे होर्डिंग उभारण्यासाठी संबंधितांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवरील वर्दळीचा फायदा घेवून त्याचप्रमाणे अॅडलॅब इमॅजिका या प्रकल्पाला केंद्रस्थानी पकडत अनेक जाहिरात कंपन्यांनी प्रसिद्धीसाठी शासकीय जमिनीचा वापर केला आहे . लाखो रु पयांचे भाडे या कामी मिळत असल्याने सरकारी व वन जमिनीवर असे प्रकार सर्रास घडत आहेत. याच कारणाने ग्रुप ग्रामपंचायत साजगाव यांच्या सारसन गावाच्या हद्दीतील एक्स्प्रेस वेलगत वाहणाऱ्या नदीपात्र व गुरचरण जमिनीत उभारलेल्या प्रचंड मोठ्या होर्डिंगमुळे वाद निर्माण झाला होता. असाच प्रकार एक्स्प्रेस वे खोपोली एक्झिटच्या दर्शनीभागी बंद असलेल्या सद्गुरु फ्लोअर मिलसमोर लावलेल्या फलकांमधून समोर येत आहे. त्याच प्रमाणे पेण व पालीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा जाहिरात फलक लागले आहेत. चालकांकडून फलक हटविण्याची मागणी होत आहे .