Join us

रस्त्यांवरील जाहिरातींमुळे अपघाताचा सर्वाधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 06:44 IST

महामार्गांवर किंवा मुख्य रस्त्यांवर असलेल्या इलेक्ट्रॉनिक जाहिरातींमुळे वाहनचालकाचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता असते.

मुंबई : महामार्गांवर किंवा मुख्य रस्त्यांवर असलेल्या इलेक्ट्रॉनिक जाहिरातींमुळे वाहनचालकाचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेने अशा जाहिरातदारांवर कारवाई करावी, अशी मागणी ट्रॅक्स रस्ते सुरक्षा स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष अनुराग कुलश्रेष्ठा यांनी केली आहे.कुलश्रेष्ठा म्हणाले की, सामान्यत: होर्डिंगवर मोठ्या अक्षरात संदेश लिहिलेला असेल, तर तो सहजरीत्या वाचता येतो. मात्र, लहान अक्षरात लिहिलेला फोन नंबर, पत्ता, ई-मेल पाहण्यासाठी काही काळ दृष्टी स्थिर ठेवावी लागते. अशा वेळी वाहनचालकांनी ते वाचण्याचा प्रयत्न केला असता, लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता असते. वाहन चालविताना एका वेळी अनेक गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे चालकाचे लक्ष एका सेकंदापेक्षा अधिक जाहिरातीकडे गेल्यास अपघात होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.काही ठिकाणी व्हिडीओ जाहिराती लावल्या जातात, पण या जाहिराती पाहताना चालकाची नजर त्यावर जास्त काळ स्थिरावते. या दरम्यान वाहनाचा वेग ताशी ५० किमी किंवा १२० किमीही असतो. वाहनाच्या वेगानुसार अपघाताचा त्या पटीने धोकाही वाढतो, तर काही जाहिरातींच्या लाइटची इंटेन्सिटी जास्त असते. तीही वाहनचालकासाठी घातक आहे. जाहिरात बोर्डची इंटेन्सिटी जास्त असेल, तर चालकाच्या डोळ्यांवर चमकून दोन सेकंदासाठी अंधार होतो. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असते, असेही ते म्हणाले.>कारवाई व्हायलाच हवी!महामार्गावर इलेक्ट्रॉनिक जाहिरातीचे बोर्ड नाहीत, परंतु महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या जमिनीवर काही बोर्ड आहेत. त्याचा वाहनचालकावर परिणाम होतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. संबंधित संस्थांनी त्यावर कारवाई करायला हवी.- विजय पाटील, पोलीस अधीक्षक, (मुख्यालय) महामार्ग पोलीस.

टॅग्स :कार