Join us

जेईईच्या विद्यार्थी नोंदणीत महाराष्ट्र आघाडीवर! १ लाख ६२ हजार ६२४ विद्यार्थी या परीक्षेला बसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 09:35 IST

जेईईच्या विद्यार्थी नोंदणीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रातून १ लाख ६२ हजार ६२४ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.

मुंबई : ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण संस्थेसह विविध नामांकित शिक्षण संस्थांमधील प्रवेशाकरिता ग्राह्य धरल्या जाणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेकरिता (जेईई-मेन) देशभरातून १२ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जेईईच्या विद्यार्थी नोंदणीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रातून १ लाख ६२ हजार ६२४ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.

जेईईचा पहिला टप्पा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी, २०२४ या दरम्यान पार पडणार आहे. जानेवारी - फेब्रुवारीत होणाऱ्या परीक्षेचा निकाल १२ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे.

आंध्र दुसऱ्या क्रमांकावर

आंध्र प्रदेशमधून १ लाख ३४ हजार ७०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तेलंगणातून १ लाख २६ हजार ७४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातून १ लाख ३९ हजार ६९६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेकरिता नोंदणी केली होती. तर आंध्रतून १ लाख आणि तेलंगणातून ९५ हजारच्या आसपास विद्यार्थी नोंदणी झाली होती.

हिंदी, गुजरातीतूनही...

जेईई एकूण १३ भाषांमध्ये घेतली जाते. यंदा इंग्रजीतून ११ लाख ४८ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत, तर ४० हजार २५६ विद्यार्थी हिंदीतून जेईई देतील. गुजरातीतून १५,७३१ विद्यार्थी जेईई देणार आहेत. तामिळमधून १४,६३६ विद्यार्थी ही परीक्षा देतील.