Join us  

वाढता उकाडा मुंबईकरांना ‘ताप’दायक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 3:00 AM

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ उष्णतेच्या लाटेने होरपळला असून, येथील बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ४५ अंशांच्या घरात नोंदविण्यात येत आहे

मुंबई : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ उष्णतेच्या लाटेने होरपळला असून, येथील बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ४५ अंशांच्या घरात नोंदविण्यात येत आहे. तर दुसरीकडे मंगळवारी मुंबईचे कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असले तरी वाढत्या उकाड्याने आणि वाहत असलेल्या उष्ण वाऱ्याने मुंबईकरांची दमछाक केली आहे. वाढता उकाडा मुंबईकरांना ‘ताप’दायक ठरत असून, अधूनमधून दाटून येत असलेले मळभ उकाड्यात आणखी भर घालत आहे. 

भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश बुधवारसह गुरुवारी अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २६ अंशाच्या आसपास राहील. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) :पुणे ३७.७, लोहगाव ४१.६, जळगाव ४१.४, कोल्हापूर ३५.१, महाबळेश्वर ३१.९, मालेगाव ४३.६, नाशिक ३७.३, सांगली ३७.७, सातारा ३८.१, सोलापूर ४२.४, मुंबई ३३.२, सांताक्रुझ ३४.६, अलिबाग ३४.७, रत्नागिरी ३३.१, डहाणू ३६.२, उस्मानाबाद ४३.४,औरंगाबाद ४२.३, परभणी ४६.१, नांदेड ४४.६, बीड ४४, अकोला ४५.२, अमरावती ४५.२, बुलढाणा ४२.२, ब्रम्हपुरी ४७, चंद्रपूर ४६.४, गोंदिया ४२, नागपूर ४६.३, वाशिम ४४, वर्धा ४५.९, यवतमाळ ४५़

टॅग्स :उष्माघातमुंबई