उच्चभ्रू सोसायट्यांची झाडाझडती!
By Admin | Updated: October 5, 2015 02:52 IST2015-10-05T02:52:13+5:302015-10-05T02:52:13+5:30
मुंबई शहर आणि उपनगरात फैलावणाऱ्या डेंग्यूला थोपविण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे आता उच्चभ्रू वस्ती आणि सोसायट्यांची झाडाझडती घेण्यात येणार आहे

उच्चभ्रू सोसायट्यांची झाडाझडती!
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात फैलावणाऱ्या डेंग्यूला थोपविण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे आता उच्चभ्रू वस्ती आणि सोसायट्यांची झाडाझडती घेण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अशा वस्त्यांमध्ये महापालिका कर्मचारीवर्गाला प्रवेश मिळावा म्हणून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद साधण्यात येणार आहे. तरीही संबंधितांनी सहकार्यास नकार दिला तर मात्र त्यांच्यावरील कारवाई अटळ असणार आहे.
मुंबईत पावसाळ्यानंतर डेंग्यूचा फैलाव सुरूच आहे. हा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येत आहे. झोपड्यांत डेंग्यूला थोपविण्यासाठी उपाययोजना करणे प्रशासनाला सोपे जात असले तरी उच्चभ्रू वस्ती आणि सोसायट्यांमध्ये कार्यवाही करण्यास प्रशासनाला अडथळे येत आहेत. विशेषत: अशा वस्त्यांमध्ये कार्यवाहीसाठी कर्मचाऱ्यांना प्रवेशच मिळत नसल्याने आव्हाने कायमच आहेत. महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी यावर कर्मचाऱ्यांना सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्याचे निर्देश दिले आहेत. भेटीदरम्यान पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून डासांची पैदास होऊ नये, म्हणून काय करता येईल? याची माहिती देण्यात येणार आहेत. विशेषत: पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद साधून ही कार्यवाही करण्यात यावी, असे आयुक्तांचे निर्देश आहेत. भेटीदरम्यान सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्यास नकार दर्शविला तर मात्र त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात यावी, असेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
ँपावसाचे साचणारे पाणी आणि बदलते वातावरण मुंबईकरांसाठी घातक आहे. म्हणून वेळीच आयुक्तांनी सर्व विभागाच्या सहायक आयुक्तांसोबत साथीचे आजारासंदर्भात बैठक घेतली. त्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले आहेत.