Join us  

कंगनाचे ऑफिस तोडणे योग्य की अयोग्य? उच्च न्यायालय आज निकाल देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 9:02 AM

Kangana ranaut : महापालिकेने ९ सप्टेंबरला कंगनाच्या कार्यालयातील बेकायदा बांधकाम पाडले होते. यानंतर कंगनाने ही कारवाई रोखण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाचा स्टे येण्याआधीच कार्यालयातील बांधकाम तोडण्यात आले होते.

बॉलिवूडची वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणौतचे ऑफिस बेकायदा बांधकाम असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने तोडले होते. सप्टेंबरमध्ये सुशांत सिंग राजपूत आत्महत्या आणि कंगनाचे महाराष्ट्र सरकारवर टीका यावरून महाराष्ट्रातील वातावरण तापले होते. या रागातूनच ही कारवाई केल्याचा आरोप कंगनाने केला होता. तर या कारवाईशी राज्य सरकारचा काही संबंध नसल्याचे शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते. या कारवाईवर आज उच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे. 

मुंबई उच्च न्यायालय आज सकाळी ११ वाजता कंगना ऑफिस कारवाई प्रकरणावर निर्णय देणार आहे. कंगनाने दाखल केलेल्या याचिकेवर ५ ऑक्टोबरला सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखीव ठेवला होता. कंगना नाराज असून ते ऑफिस तिच्यासाठी स्वप्नांचे ऑफिस होते. वकिलाने हे देखील सांगितले की, महापालिकेने ही कारवाई कोणाच्या तरी सांगण्यावरून केलेली आहे. कंगनाच्या ऑफिसचे जेवढे नुकसान झाले आहे त्याची एकूण रक्कम 2 कोटींच्या घरात जाते. तसेच कंगनाने उच्च न्यायालयात बीएमसीने बेकायदा कारवाई केल्याचे अॅफिडेव्हीट दिले आहे. बीएमसी अधिकाऱ्यांच्याविरोधात कारवाई करणार असे तिचे म्हणणे आहे.

महापालिकेने ९ सप्टेंबरला कंगनाच्या कार्यालयातील बेकायदा बांधकाम पाडले होते. यानंतर कंगनाने ही कारवाई रोखण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाचा स्टे येण्याआधीच कार्यालयातील बांधकाम तोडण्यात आले होते. यानंतर कंगनाने उच्च न्यायालयात ही कारवाई बेकायदा असल्याचे सांगत नुकसानभरपाई मागितली होती. 

तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंगनाचे हे ऑफिस रेसिडेंशिअल एरियात येत आणि चुकीच्या पद्धतीने नूतनीकरण करून ऑफिस बनविल्याचा आरोप केला होता. तसेच पालिकेने दोन दिवस आधी नोटीसही पाठविली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. 

टॅग्स :कंगना राणौतमुंबई महानगरपालिकाशिवसेनाउच्च न्यायालय