धनंजय देसाईचा जामीन हायकोर्टाने फेटाळला
By Admin | Updated: March 8, 2015 02:32 IST2015-03-08T02:32:09+5:302015-03-08T02:32:09+5:30
पुणे येथे झालेल्या एका मुस्लीम तरुणाच्या हत्येच्या गुन्ह्यासाठी अटकेत असलेले हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याला उच्च न्यायालयाने जामीन नाकारला.

धनंजय देसाईचा जामीन हायकोर्टाने फेटाळला
मुंबई : शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल साइटवर प्रसारित केल्याप्रकरणी पुणे येथे झालेल्या एका मुस्लीम तरुणाच्या हत्येच्या गुन्ह्यासाठी अटकेत असलेले हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याला उच्च न्यायालयाने जामीन नाकारला.
गेल्या वर्षी ही छायाचित्रे प्रसारित झाली होती. त्या वेळी पुणे येथे मोहसीन शेख या तरुणाची हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी देसाई व इतरांना पोलिसांनी अटक केली होती. देसाईने पुणे सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर देसाईने उच्च न्यायालयात धाव घेतली.
देसाईच्या जामीन अर्जाला सरकारी वकील अरफान सेठ यांनी विरोध केला. समाजात तेढ निर्माण केल्याचे गुन्हे देसाईविरोधात दाखल आहेत. त्यामुळे जामीन मिळाल्यानंतर देसाई असे कृत्य करणार नाही, याची शाश्वती देता येणार नाही. त्यामुळे त्याला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद अॅड. सेठ यांनी केला. शेखच्या भावानेही या संदर्भात स्वतंत्र अर्ज करून देसाईच्या जामीन अर्जाला विरोध केला. (प्रतिनिधी)