Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिस्तभंगाच्या सुनावणीस सामोरे जा; हस्तक्षेप नाही, गुणरत्न सदावर्तेंना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 06:32 IST

काैन्सिलला असलेल्या वैधानिक अधिकारात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे न्या.गौतम पटेल व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने म्हटले.

मुंबई : बार काैन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांनी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी शिस्तभंगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. शिस्तभंगाच्या सुनावणीला सामोरे जा. त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. 

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी दोन तक्रारी व  त्यावर बार काैन्सिलने बजावलेल्या नोटिसीला आव्हान दिले आहे. राजकीय सूडापोटी या दोन्ही तक्रारी करण्यात आल्याचा सदावर्तेंचा आरोप आहे. त्यांच्याविरोधातील एक तक्रार रद्द करण्याचा आदेश उच्च न्यायालयानेच बार काैन्सिलला दिला होता. सदावर्ते यांच्याविरोधातील दुसऱ्या तक्रारीत एसटी कर्मचारी संपादरम्यान सार्वजनिक ठिकाणी वकिलांचा काळा गाऊन व बँड घालून सदावर्ते यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे नमूद आहे.

काैन्सिलला असलेल्या वैधानिक अधिकारात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे न्या.गौतम पटेल व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने म्हटले.  सदावर्ते वकील आहेत किंवा त्यांच्याविरोधात केलेली तक्रार राजकीय हेतूने प्रेरित आहे म्हणून त्यांना विशेष वागणूक देणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :उच्च न्यायालय