Join us  

पासपोर्ट नूतनीकरणप्रकरणी कंगनाला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 7:15 AM

जावेद अख्तर मानहानी दावा; सुनावणीस अनुपस्थित राहण्यासाठी दंडाधिकारी न्यायालयात अर्ज

मुंबई : पासपोर्ट नूतनीकरण प्रकरणात उच्च न्यायालयाने अभिनेत्री कंगना रनौतला तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला.न्या. एस. एस. शिंदे, न्या. जी. ए. सानप यांनी कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांना अन्य खंडपीठापुढे याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यासाठी अर्ज करण्याची परवानगी दिली. तसेच तिचा आगामी चित्रपट ‘धाकड’च्या निर्मात्यालाही बाजू मांडण्याची मुभा दिली.

या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तिला बुडापेस्टला जायचे आहे. मात्र, देशद्रोहाचा गुन्हा असल्याने पासपोर्ट प्रशासनाने पासपोर्टच्या नूतनीकरण केले नाही. सुनावणीत सिद्दिकी व चित्रपट निर्मात्याच्या वतीने ॲड. हृषीकेश मुंदर्गी यांनी सांगितले की, चित्रीकरणाचे वेळापत्रक आधीच ठरले आहे.

कंगना बुडापेस्टला पोहोचू न शकल्यास दरदिवशी १५ लाखांचे नुकसान होत आहे. त्यावर खंडपीठाने कामकाजाची वेळ संपल्याने तातडीने सुनावणीसाठी अर्ज करण्याची मुभा दिली. ट्विट करून दोन समाजांत तेढ निर्माण केल्याच्या आराेपाखाली वांद्रे पोलिसांनी कंगना, बहीण रंगोलीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला. 

प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीस  कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची मुभा मिळावी, यासाठी कंगनाने अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला. कामानिमित्त देश, परदेशात फिरावे लागते. दरवेळी सुनावणीला उपस्थित राहणे अवघड हाेईल, असे तिने अर्जात म्हटले. तर, अर्जदार कामावर उपस्थित राहू शकली नाही तर तिचे व प्रोडक्शन हाऊसचे मोठे आर्थिक नुकसान होईल, असे कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी सांगितले. 

अख्तर यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये कंगना विरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. तिने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली बदनामी करून प्रतिष्ठा मलिन केली, असा त्यांचा आराेप आहे. न्यायालयाने सुनावणी २७ जून रोजी ठेवली आहे. 

टॅग्स :कंगना राणौतजावेद अख्तर