इथे लाज सोडाच...

By Admin | Updated: December 21, 2014 02:10 IST2014-12-21T02:10:03+5:302014-12-21T02:10:03+5:30

भांडूपमध्ये चार वर्षांच्या चिमुरडीवर शाळेतल्या पर्यवेक्षकानेच बलात्कार केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे

Here's the shame ... | इथे लाज सोडाच...

इथे लाज सोडाच...

भांडूपमध्ये चार वर्षांच्या चिमुरडीवर शाळेतल्या पर्यवेक्षकानेच बलात्कार केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. बंगलोरमध्ये गेल्या सहा महिन्यांत अशा प्रकारच्या तीन घटना उघडकीस आल्या. या घटना ऐकूनच मन विषण्ण होते. वासनांधतेची परिसीमा गाठणाऱ्या भांडुपच्या घटनेनंतर कुटुंबीयांनी लाजेखातर ही माहिती दडवून ठेवण्याचा प्रकार असो किंवा रुग्णालयाकडून पोलिसांना माहिती देण्यास झालेली टाळाटाळ असो, या गोष्टीही अस्वस्थ करून जातात. ज्या चिमुरडीला अजून नीट बोलताही येत नाही तिच्यावर बलात्कार होतो, तिने माहिती देऊनही तब्बल नऊ दिवसांनी या प्रकरणाला वाचा फुटते हे सगळेच चिंताजनक आहे.
केवळ बदनामी होईल म्हणून त्या चिमुरडीचे कुटुंबीय एवढी गंभीर गोष्ट लपवू पाहतात ही त्यांची हतबलता नेमकी कशातून आली आहे ते शोधायला हवे. समाजात बदनामी होईल हे जसे वाटत असते, तसेच मानसिक पातळीवरही उलथापालथ होत असते. त्यातूनच मनात भय निर्माण होते, त्याला सामाजिक दडपणाची जोड मिळाली की विचार खुंटतात. व्यक्ती बचावात्मक पवित्र्याकडे वळते आणि मग त्या घटनेतील गांभीर्य, त्याविषयीची चीड हळूहळू कमी होत जाते. जर हा प्रकार समोरही आला नसता तर या घटनेतही कदाचित असेच घडले असते. पण त्या चिमुरडीला त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला पुन्हा डॉक्टरकडे घेऊन जावे लागल्याने आणि एका स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतल्याने हा प्रकार समोर आला. त्या घटनेतील ही एकमेव जमेची बाजू! नाही तर या संपूर्ण घटनाक्रमामध्ये सुरुवातीला प्रत्यक्ष आणि नंतर नैतिकदृष्ट्या वारंवार त्या निरागस बालिकेवर बलात्कार होतच राहिला.
हे सगळे बरोबर असले तरी मुळात ज्या पर्यवेक्षकाने बलात्कार केला, त्याच्या या गुन्ह्याकडे आणि कृत्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. असे कृत्य करणे ही विकृत मनोवृत्तीच आहे. लैंगिक भावना अभिव्यक्त करण्याची एक सामाजिक चौकट आहे. कुठल्याही घटनेमध्ये ही चौकट जेव्हा मोडली जाते तेव्हा ते दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावरचे आक्रमण ठरते. सुदृढ मानसिक अवस्था असलेल्या एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून असे कृत्य केले तर तो गुन्हा आहेच. मात्र मानसिक आजारातून एखाद्याच्या हातून हे घडले तर ती एक गंभीर समस्या आहे. या विकारावर वेळीच उपचाराची गरज आहे. मानसिक आजार या प्रकाराकडे यानिमित्ताने प्रकाश टाकण्याची आवश्यकता आहे. कारण या घटना कायद्याच्या धाकाने थांबणार नाहीत. त्यामुळे हा आजार शोधून त्या-त्या व्यक्तींवर उपचार व्हायला हवेत.
अर्थात सर्वच शाळा आणि तेथील कर्मचाऱ्यांकडे संशयाने पाहण्याचे काहीच कारण नाही, मनोविकृतीचे प्रमाण असणाऱ्यांची संख्या नगण्य असेल, पण त्यांना शोधण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. गुन्हेगाराच्या कृत्याचे कधीच समर्थन करता येणार नाही, हे बरोबर असले तरी असे गुन्हे रोखण्यासाठीची सतर्कता बाळगण्याची जबाबदारीही सर्वांचीच आहे. विशेषत: शाळकरी मुलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत म्हणायचे झाले तर पालकांनी जरा जास्त सजग राहण्याची आवश्यकता आहे. केवळ शैक्षणिक गुणवत्ता आणि भौतिक सुविधांनी परिपूर्ण असलेली शाळा निवडली की जबाबदारी संपत नाही. त्या शाळेतील कर्मचारी, शिक्षक यांच्याशी पालकांचा संवाद वाढायला हवा, तो केवळ औपचारिकही राहायला नको तर त्यातून स्नेहही वृद्धिंगत व्हायला हवा. एकदा का असे घडू लागले की, आपोआप सकारात्मक वातावरण वाढीस लागेल.

अशा प्रकारच्या घटनांमधून शाळा व्यवस्थापनांनी बोध घेण्याची आवश्यकता आहे. संस्थेतील कर्मचाऱ्यांची मानसिक तपासणी करून घ्यायला हवी. पालकांनीही यासाठी दबाव निर्माण करायला हवा. आपला पाल्य कोणाच्या तरी मनोविकृतीचा बळी ठरू नये याची खबरदारी घ्यायलाच हवी. मुळात निकोप मनोवस्था असलेला कर्मचारीवर्ग शाळेत असायला हवा ही संकल्पना रूजवण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

विकृतीकडे
नेणारा मनोविकार
लैंगिक भावना किंवा उत्तेजना या दृष्टीने विचार केला तर सेक्सॉलॉजिस्ट डॉ. राजन भोसले सांगतात की, याचे सामान्यत: तीन भाग पडतात ते म्हणजे आक्रमकता, बालासक्ती (पिडोसिलिया) आणि हार्मोन्स-मानसिक अवस्था. सामाजिक चौकट मोडणारी ही लैंगिक भावना विकृतीकडे घेऊन जाणारी असते.

आक्रमकता
यामध्ये लैंगिक भावनेपेक्षा आक्रमकतेचा अंश जास्त असतो. स्वत:मध्ये न्यूनगंड असणारी व्यक्ती शक्य असेल तिथे पौरुषत्व दाखवायला जाते.

बालासक्ती (पिडोसिलिया)
अशा व्यक्तींना फक्त लहान मुलांचे आकर्षण असते. ही व्यक्ती कितीही सुंदर असलेल्या तरुण किंवा प्रौढ व्यक्तीकडे आकर्षित होत नाही. लहान मुलांवर अत्याचार करतानाही अशा व्यक्ती आधी त्या मुलांचा विश्वास संपादन करतात आणि मग आपला हेतू साध्य करतात.

अमेरिकेत यासंबंधी एक सर्व्हे झाला होता त्यानुसार शिक्षकी पेशात असलेले ४ टक्के लोक या आजाराने पीडित असल्याचे आढळले. यापुढे जाऊन त्यातली गंभीर बाब म्हणजे या लोकांनी जाणीवपूर्वक हा पेशा निवडला होता, कारण आपली इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांना शाळकरी मुले ही सॉफ्ट टार्गेट वाटतात.

हार्माेन्स-मानसिक अवस्था
या प्रकारातल्या व्यक्तींना वासनांध असे संबोधले जाते. फक्त शारीरिक भूक भागवणे हेच एक ध्येय अशा व्यक्तींसमोर असते. या व्यक्ती प्रसंगी वृद्ध किंवा तृतीयपंथीयांवर बलात्कार करायलाही मागेपुढे पाहत नाहीत.

मुलाला शाळेत सोडणे आणि घरी सुरक्षित आणणे एवढीच जबाबदारी न समजता शाळेत तो ज्या वातावरणात वावरतो त्याची माहितीही ठेवणे आवश्यक आहे.

ज्या चिमुरडीला अजून नीट बोलताही येत नाही तिच्यावर बलात्कार होतो, तिने माहिती देऊनही तब्बल नऊ दिवसांनंतर या प्रकरणाला वाचा फुटते हे सगळेच चिंताजनक आहे. त्याहीपेक्षा केवळ बदनामी होईल म्हणून त्या चिमुरडीचे कुटुंबीय एवढी गंभीर गोष्ट लपवू पाहतात ही त्यांची हतबलता नेमकी कशातून आली याच्या मुळाशी गेले की तळमळीने सांगावेसे वाटते, इथे ‘लाज’ सोडाच... आणि वेळीच आवाज उठवा!

सुनील पाटोळे

Web Title: Here's the shame ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.