हॅपेटायटिस ‘ए’ आणि ‘ई’मध्ये २१ टक्क्यांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 01:27 IST2020-01-02T01:26:56+5:302020-01-02T01:27:07+5:30
तीन वर्षांतील आकडेवारी; संसर्ग वाढू लागला; काळजी घेण्याचे आवाहन

हॅपेटायटिस ‘ए’ आणि ‘ई’मध्ये २१ टक्क्यांनी वाढ
मुंबई : मागील तीन वर्षांत शहर, उपनगरांतील हॅपेटायटिस ‘ए’ आणि ‘ई’मध्ये २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१७ आणि २०१८ सालच्या रुग्णसंख्येचा आढावा घेतला असता २०१९मध्ये यात २१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसत आहे. २०१७ व २०१८ साली हॅपेटायटिसच्या रुग्णांची संख्या अनुक्रमे १ हजार २३४ व १ हजार १४७ इतकी होती. मात्र २०१९मध्ये ही संख्या १ हजार ४९४पर्यंत पोहोचली.
हॅपेटायटिस रुग्णांच्या वाढत्या प्रमाणाचा आढावा घेताना वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले की, हल्ली हेपेटायटिसचा संसर्ग अत्यंत गंभीर स्वरूप धारण करू लागला आहे. त्यातील हेपेटायटिस ‘ए’ व ‘ई’ची लागण दूषित पाणी, अन्नाच्या माध्यमातून होते. मलेरिया, डेंग्यू व लिव्हरला आलेली सूज ही सर्व हेपेटायटिसची लागण होण्याआधीची लक्षणे आहेत. ब्युरो आॅफ इंडियन स्टॅण्डर्डच्या निकषांप्रमाणे, यंदा मुंबईतील नळाचे पाणी अन्य शहरांच्या तुलनेत शुद्ध असल्याचे निरीक्षण दिसून आले आहे. याखेरीज, जून व जुलै या दोन महिन्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे ५५२ रुग्ण आढळले आहेत. तर यंदा मे महिन्यात एका रुग्णाचा हॅपेटायटिसने बळी गेला. गेल्या वर्षी एकाही मृत्यूची नोंद नव्हती. डॉ. सागर शौरी म्हणाले की, शहर-उपनगरात दररोज किमान तीन जणांना हॅपेटायटिस ‘ए’ व ‘ई’ची लागण होते. हेपेटायटिस ई गर्भवती महिलांसाठी किंवा रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तींसाठी धोकादायक असू शकतो. यात आजारी मुले वा वयस्कर व्यक्तींचा समावेश होतो. त्यामुळे स्वच्छतेच्या चांगल्या सवयी पाळणे, हे हेपेटायटिस ‘ई’ व ‘ए’चा संसर्ग टाळण्याचा प्राथमिक उपाय आहे.