हेमराज शाह मराठीचे अॅम्बेसेडर
By Admin | Updated: March 25, 2015 23:01 IST2015-03-25T23:01:59+5:302015-03-25T23:01:59+5:30
‘मुंबई जेव्हा द्विभाषकी राज्य होते, त्यावेळी मराठी आणि गुजराती समाज गुण्यागोविंंदाने नांदत होते. मात्र जेव्हा गुजरात मुंबईपासून वेगळा झाला त्यावेळी या दोन्ही समाजात दुरावा वाढेल,

हेमराज शाह मराठीचे अॅम्बेसेडर
मुंबई : ‘मुंबई जेव्हा द्विभाषकी राज्य होते, त्यावेळी मराठी आणि गुजराती समाज गुण्यागोविंंदाने नांदत होते. मात्र जेव्हा गुजरात मुंबईपासून वेगळा झाला त्यावेळी या दोन्ही समाजात दुरावा वाढेल, यात दरी निर्माण होईल, अशी भीती वाटत होती. पण हेमराज शाह यांनी ती भीती दूर केली. हेमराजभाई हे खऱ्या अर्थाने गुजरातचे अॅम्बेसेडर आहेत’, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बृहन्मुंबई गुजराती समाजाचे अध्यक्ष हेमराज शाह यांचा गौरव केला.
हेमराजभाई शाह अमृतमहोत्सव समिती आणि अरविंदभाई व उदयभाई शाह परिवारातर्फे ठाकर्स बिर्ला क्रीडा केंद्र चौपाटी येथे हा सोहळा पार पडला. यावेळी शरद पवार यांच्या हस्ते हेमराजभार्इंचा भव्य सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
‘कच्छमध्ये झालेल्या भूकंपानंतर केंद्राने पुनर्वसनाच्या कामाची जबाबदारी माझ्यावर सोपविली होती. मूळचे कच्छचे असलेले हेमराजभाई मुंबईतून मोठी कुमक घेऊन तिथे पोहोचले. त्यावेळी त्यांनी केलेल्या कामाला तोड नाही. हेमराजभार्इंनी गुजराती समाजासाठी निरपेक्षवृत्तीने केलेले काम खूप मोठे आहे’, असेही पवार पुढे म्हणाले.
या सोहळ्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुण गुजराथी, माजी खासदार भारतकुमार राऊत, उद्योगपती दामजी अेंकरवाला, दिग्दर्शक असित मोदी, अभिनेते दिलीप जोशी, अरविंद त्रिवेदी, दिशा वाकाणी, गुजरातचे आमदार राकेश शाह, बाबुभाई शाह, लोकमत वृत्तपत्र समूह संपादक दिनकर रायकर, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक, कॉँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार, भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये, उद्धव ठाकरे यांचे जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान, मुंबई राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)