Join us  

शाळांच्या शुल्कवसुलीच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक हवा... !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 4:51 PM

शुल्कवसुली न करण्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शैक्षणिक संस्थाविरोधातील कारवाईसाठी युवासेनेची मागणी

मुंबई : राज्यातील लॉकडाऊनची परिस्थितीमुळे सगळ्यांवरच आर्थिक संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत पालकांकडून सुरु असलेल्या किंवा चालू होणाऱ्या आगामी शैक्षणिक वर्षाची शुल्कवसुलीसाठी तगादा लावण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. शिक्षण विभागाच्या सुचना असतानाही त्या नियमांचा भंग करणाऱ्या शाळांविरोधात पालकांना थेट तक्रार दाखल करता यायला हवी. यासाठी राज्यातील मुंबई , पुणे नाशिक , कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती , नागपूर, लातूर या सात विभागातील शिक्षण उपसंचालक कार्यालयात हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात यावा अशी मागणी युवसेनेकडून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करण्यात आली आहे. यामुळे शिक्षण विभागाच्या मार्दर्शक सूचनांना केराची टोपली दाखविणाऱ्या शाळांवर योग्य ती कारवाई होऊ शकेल व पालकांना आर्थिक दिलासा मिळू शकेल अशी प्रतिक्रिया युवासेना कोअर कमिटी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी दिली. राज्यात आणि देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व उद्योगधंदे आणि कामे बंद आहेत. अशा परिस्थितीत शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार शाळांनी पालकांकडे शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये. तसेच शिक्षण विभागाने जरी केलेल्या निर्णयानुसार पालकांच्या सुविधेसाठी शाळांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ साठीचे शुल्क एकाच वेळी न घेता मासिक किंवा त्रैमासिक पद्धतीने जमा करण्याचा पर्याय पालकांना उपलब्ध करून द्यावाअसे शाळांना सांगण्यात आले आहे. किंवा  शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी काही शैक्षणिक सुविधांचा वापर होणार नसल्यास, त्यासाठीचा खर्च कमी होणार असल्यास पालकांच्या कार्यकारी समितीत (ईपीटीए) ठराव करून त्या प्रमाणात शुल्क कमी करावे असे सुचविले आहे. सोबतच लॉकडाऊनच्या कालावधीत पालकांकडून कोणत्याही प्रकारची शुल्कवसुली केली जाऊ नये अशा सूचना सर्व व्यवस्थापनाच्या व मंडळाच्या मनपा खाजगी प्राथमिक , अनुदानित , विना अनुदानित शाळांना परिपत्रक काढून निर्गमित केल्या असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली.मात्र अनेक खाजगी अनुदानित , विनाअनुदानित शाळा  या नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या तक्रारी वारंवार युवासेनेकडे येत सल्ल्याची माहिती दुर्गे यांनी दिली. अशा शैक्षणिक संस्थांविरोधात पालकांना थेट तक्रार करता यावी यासाठी हा हेल्पलाईन क्रमांक आवश्यक असल्याचे ही त्यांनी सांगितले.

टॅग्स :शिक्षण क्षेत्रकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस