हवी उपचाराच्या माहितीची ‘हेल्प’

By Admin | Updated: January 11, 2015 01:06 IST2015-01-11T01:06:51+5:302015-01-11T01:06:51+5:30

एचआयव्ही एड्स म्हणजे काय? कशामुळे होतो एड्स? असे दबक्या आवाजात माहिती विचारणारे कॉल्स साधन हेल्पलाइनवर काही वर्षांपूर्वी यायचे.

'Help' information for the treatment | हवी उपचाराच्या माहितीची ‘हेल्प’

हवी उपचाराच्या माहितीची ‘हेल्प’

पूजा दामले ल्ल मुंबई
एचआयव्ही एड्स म्हणजे काय? कशामुळे होतो एड्स? असे दबक्या आवाजात माहिती विचारणारे कॉल्स साधन हेल्पलाइनवर काही वर्षांपूर्वी यायचे. पण गेल्या काही वर्षांत एड्स होण्याची भीती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेमुळे हेल्पलाइनवर येणाऱ्या कॉल्सच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. एड्सच्या प्राथमिक माहितीसाठी अत्यंत कमी तर त्याचवेळी एड्सवरील उपचारांसाठी माहिती हवी असणाऱ्यांच्या कॉल संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचे मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीच्या अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले.
गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतल्यास, साधन हेल्पलाइनवर येणाऱ्या कॉल्सच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या एका वर्षाच्या कालावधीत हेल्पलाइनवर १५ हजार ८६३ कॉल्स आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात कॉल्सचे प्रमाण २७ टक्क्यांनी वाढले आहे. इतर आजारांविषयी माहिती विचारणारे कॉल्स येतात. पण एड्स संदर्भात येणाऱ्या कॉल्सचे प्रमाण ७० टक्के इतके आहे.
काही वेळा विवाहपूर्व अथवा विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवले जातात. त्यानंतर एड्स होण्याची भीती मनात घर करते. मग एड्सचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला तरी मनात घर केलेली भीती जात नाही. यामुळे आम्हाला एड्स होईल का, मग आता काय करू? पुढे जाऊन याचा किती आणि कसा परिणाम होईल, अशी विचारणा करणारे कॉल्स येत असतात, एका समुपदेशकाने सांगितले.

एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ मध्ये आलेले कॉल्स
आजारकॉल्स
एचआयव्ही १०,८०२
रक्तदान६८०
टीबी३२१
पावसाळी आजार२२९७
डायबेटिस१३७६
आरोग्यविषयक१०५

सर्वांसमोर उपचारांविषयी चर्चा करता येत नाही, पण हेल्पलाइनवर वैयक्तिक माहिती न देता बोलू शकतो, यामुळे अनेक जण मोकळपणे बोलतात, असे डॉ. आचार्य यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत एड्स या आजाराविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली आहे. यामुळे एड्स कशामुळे होतो, त्याची कारणे काय याविषयी सामान्य लोकांना माहिती झाली आहे. इंटरनेटद्वारेही याविषयी माहिती मिळते. पण एड्स झाला असल्याची भीती मनात असणाऱ्यांना तपासणी कुठे करायची हे माहीत नसते. अजूनही आपल्याकडे शारीरिक संबंध, एड्स अशा विषयांवर खुलेआमपणे चर्चा होत नाही. यामुळे उपचार कुठे मिळतील, तपासणी करण्यासाठी कुठे जावे, याविषयी विचारणा करणारे कॉल्स येतात.

Web Title: 'Help' information for the treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.