Join us  

राज्यातील भाजपाचे मनोबल वाढण्यास मदत, सत्ता टिकविण्याची सत्त्वपरीक्षा

By यदू जोशी | Published: May 16, 2018 5:38 AM

कर्नाटकमध्ये भाजपाला बहुमत मिळाले नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या सामन्यात मोदींची सरशी झाल्याचे चित्र समोर आल्याने बाजूच्या महाराष्ट्रातील भाजपाचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे.

मुंबई : कर्नाटकमध्ये भाजपाला बहुमत मिळाले नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या सामन्यात मोदींची सरशी झाल्याचे चित्र समोर आल्याने बाजूच्या महाराष्ट्रातील भाजपाचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे. एक वर्षाने लोकसभा निवडणुकीला तर दीड वर्षाने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या प्रदेश भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनोबल या निकालाने निश्चितच उंचावले आहे.लहान भाऊ शिवसेना दररोज त्रास देत केंद्र, राज्य सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर सडकून टीका करीत असते. कर्नाटकच्या निकालाने शिवसेनेच्या भूमिकेत फारसा फरक पडण्याची शक्यता नसली तरी भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढल्याने शिवसेनेच्या टीकेला चोख प्रत्युत्तर भाजपाकडून यापुढे दिले जाण्याची शक्यता आहे.गोंदिया-भंडारा आणि पालघर या दोन लोकसभा पोटनिवडणुकींसाठी २८ मे रोजी मतदान होणार आहे. कर्नाटकच्या निकालाचा थेट परिणाम या पोटनिवडणुकीवर होणार नसला तरी भाजपा कार्यकर्ते, नेत्यांच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचा फायदा पक्षाच्या उमदेवारांना होऊ शकेल. पालघरमध्ये भाजपासमोर मित्र पक्ष शिवसेना, बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेसचेही आव्हान आहे.महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादीचे बरेच नेते साधारणत: वर्षभरापूर्वीपर्यंत भाजपाच्या संपर्कात होते आणि भाजपा प्रवेशाची तयारी त्यांनी दर्शविली होती. तथापि, अलीकडे मोदी सरकारविरुद्ध वातावरण तयार होत असल्याचे व २०१९मध्ये मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत असे चित्र समोर आल्यानंतर या नेत्यांनी भाजपा प्रवेशाचे आपले इरादे थांबविले.मात्र, कर्नाटकच्या निकालानंतर भाजपामध्ये इनकमिंग सुरू होऊ शकेल. अर्थात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांना अन्य पक्षातील नेत्यांना लगेच भाजपात आणण्याची घाई नाही. लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी त्याबाबतची मोहीम हाती घेतली जाईल. भाजपाबाबत कर्नाटकमधील आव्हान आणि महाराष्ट्रातील आव्हानात मोठा फरक हा आहे की कर्नाटकात प्रस्थापित काँग्रेसला हटवायचे होते तर महाराष्ट्रात असलेली सत्ता टिकवायची आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सध्या शिवसेनाही विरोधात असताना महाराष्ट्रात भाजपाची सत्त्वपरीक्षा असेल. मंगळवारच्या कर्नाटक दिग्विजयाने भाजपाचा हुरूप वाढविला आहे.>आमचाच विजयपालघरमध्ये काही जणांनी राजकारणाचे नियम मोडले त्यांना जनता बाद करेल. कोणी कितीही कपट-कारस्थान केले तरी भाजपाचा विजय निश्चित आहे, असे खा. दानवे यांनी शिवसेनेचे नाव न घेता सुनावले.>कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी नेतृत्त्वाचा आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या कुशल नियोजनाचा आणखी एक विजय आहे. या यशाबद्दल कर्नाटकची जनता आणि येदीयुरप्पा यांचेही मी मन:पूर्वक अभिनंदन करतो. तसेच विकासाच्या मार्गाची निवड केल्याबद्दल जनतेला धन्यवाद देतो.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

टॅग्स :आशीष शेलारकर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८कर्नाटक निवडणूक निकाल २०१८