Join us  

मच्छीमार बांधवांचा आक्रोश समजून मदत करा; आमदार आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 3:46 PM

ससून डॉक, मढ, खार दांडा, माहिम येथे प्रचंड नुकसान झाले आहे, तर वरळीत कोव्हलँन्ड जेटीवर अद्याप पंचनामेच झाले नाहीत, अशी माहिती त्यांनी लोकमतला दिली.

मुंबई - तौक्ते वादळाने नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांचा आक्रोश सरकारने समजून घेऊन सध्याच्या जीआरमध्ये बदल करावा आणि मच्छिमार बांधवांना मदत करावी, असे मत भाजप नेते व आमदार अॅड. आशिष शेलार यांनी नुकतेच व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ देऊन या मच्छीमारांचा आक्रोश समजून घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. (Help the fishermen MLA Ashish Shelar's demand to the Chief Minister)

ससून डॉक, मढ, खार दांडा, माहिम येथे प्रचंड नुकसान झाले आहे, तर वरळीत कोव्हलँन्ड जेटीवर अद्याप पंचनामेच झाले नाहीत, अशी माहिती त्यांनी लोकमतला दिली.

तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या किनारपट्टीचा  आमदार अँड आशिष शेलार आणि भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी दोन दिवसाचा दौरा केला. पहिल्या दिवशी वसई डहाणू, सातपाटी या पालघरमधील परिसराची पाहणी केली. तर काल त्यांनी ससून डॉक, वरळी, माहीम, वर्सोवा, मढ या मुंबईच्या मच्छिमार बंदरांना भेटी देऊन मच्छीमार बांधवांच्या नुकसानीची पाहणी करून मच्छिमार बांधवांशी संवाद साधला.

ससून डॉक येथील सुमारे 55 बोटींचे नुकसान झाले असून मासेमारीचे साहित्य, जाळी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्याच्या जीआर नुसार, आम्हाला मदत मिळू शकत नाही. कृपया सरकारने आमचे नुकसान समजून घेऊन मदत करावी, अशी विनंती येथील ससून डाँक फिशरमेन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

त्यानंतर वरळी येथील कोव्हलँन्ड जेटीला आमदार अँड आशिष शेलार यांनी भेट दिली असता येथे दोन बोटींचे प्रचंड नुकसान झाले असून जेटीही फुटली आहे. मात्र अद्याप या ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे आमच्या नुकसानीचे पंचनामे करा, अशी विनंती कोळी बांधव करीत होते.

माहीम रेतीबंदर कोळीवाडा गावठाण रहिवासी संघ, येथे आमदार आशिष शेलार यांनी भेट देऊन मच्छिमार बांधवांशी संवाद साधला तेव्हा त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. येथे सहाहून अधिक बोटींचे नुकसान झाले असून खलाशी ही बुडाले आहेत. त्यामुळे आम्हाला तातडीने भरीव मदत द्या, अशा मागणीचा टाहो हे बांधव फोडत होते. आमच्या पोटापाण्याचे साधनच हिरावून घेतले आहे. त्यामुळे मच्छीमार महिला आक्रोश करीत होत्या.

खार दांडा येथील बोटींचे नुकसान झाले असून या वादळाचा मोठा फटका खार दांडा बंदराला बसला आहे. त्यानंतर वर्सोवा येथील बोटींचे नुकसा तर झालेच असून शिवाय जाळी आणि अन्य साहित्य वाहून गेले आहे. तर मढ येथील कोळी बांधवांचे सर्वात जास्त नुकसान झाले असून 40 हून अधिक बोटी फुटल्या, बुडाल्या आहेत. जाळी वाहून गेली. काही बोटींच्या इंजिनमध्ये पाणी शिरले व नादुरुस्त झाले आहे. मढ येथील कोळी महिला तर रडून आपले दु:ख सांगताना आपले आता कसे होणार? आम्ही कसे पोट भरणार? आम्ही पोराबाळांना काय खायला घालणार? असा आक्रोश करुन मदतीसाठी आर्जव करीत होत्या.

आमदार अँड आशिष शेलार यांनी मच्छिमारांना धीर देऊन शासन मदत करेल. आपला आवाज आम्ही सरकारपर्यंत पोहचवू. राज्य शासनाचा सध्याचा मदतीचा जीआर तोकडा असून त्यामध्ये बदल करुन बोटींचे नुकसान, नादुरुस्त इंजिन, जाळी, मच्छीचे ट्रे या सगळ्या बाबींचा समावेश करून मदत देणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने जीआर बदलणे आवश्यक आहे. आम्ही सरकारला त्याबाबत विनंती करू असा दिलासा त्यांनी दिला.

दोन दिवस मुंबईपासून पालघर पर्यंतच्या मच्छीमारांना भेटून आम्ही जे पाहिले आणि निवेदने स्वीकारली, त्यातील सर्व  बाबींचा समावेश करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देऊ, तसेच ही दाहकता त्यांच्या लक्षात आणून देऊ, असे शेलार म्हणाले. तसेच भाजपतर्फेही प्राथमिक स्वरूपात मदत करू, असा दिलासाही त्यांनी यावेळी नागरिकांना दिला.

या वेळी आमदार राहुल नार्वेकर, आमदार भारती लव्हेकर, नगरसेविका शितल गंभीर, मुंबई भाजपा चिटणीस विनोद शेलार, कमलाकर दळवी, अक्षता तेंडुलकर, आर. यु. सिंग, सुनील कोळी यांच्यासह भाजपा स्थानिक पदाधिकारी आपापल्या विभागात उपस्थिती होते. 

टॅग्स :आशीष शेलारमच्छीमारतौत्के चक्रीवादळपालघर