‘हॅलो, हा माझा नवीन नंबर आहे... अनोळखी संदेशाने केले अनेकांचे बँक खाते रिकामे

By मनीषा म्हात्रे | Updated: May 2, 2025 11:28 IST2025-05-02T11:28:09+5:302025-05-02T11:28:36+5:30

सानपाडा येथील रहिवासी असलेल्या नीता तानपुरे (४४) या एका फार्मा कंपनीत सीनिअर अकाउंटंट म्हणून काम करतात. कंपनीत तरुण गुप्ता आणि राजेश गुप्ता संचालक आहेत.

‘Hello, this is my new number…’ An unknown message emptied many people’s bank accounts | ‘हॅलो, हा माझा नवीन नंबर आहे... अनोळखी संदेशाने केले अनेकांचे बँक खाते रिकामे

‘हॅलो, हा माझा नवीन नंबर आहे... अनोळखी संदेशाने केले अनेकांचे बँक खाते रिकामे

मनीषा म्हात्रे

मुंबई : ‘हॅलो, हा माझा नवीन नंबर आहे. जुना क्रमांक डीलीट करून हा नंबर सेव्ह करा.’ गेल्या काही दिवसांपासून याच संदेशाने अनेकांचे बँक खाते रिकामे केले आहे. संदेशावरील मालक, संचालक, कर्मचारी, नातेवाइकांचा फोटो बघून खातरजमा न करता सायबर भामट्याला कोट्यवधी रुपये पाठवत असल्याचे दिसून येते. संबंधित व्यक्ती जवळपास असताना त्यांना साधी विचारणा करणेही गरजेचे न समजता हे व्यवहार होत आहेत. त्यामुळे सतर्क होत आपण नेमके कुणाला पैसे पाठवतो आहे, याची खातरजमा करणे गरजेचे असल्याचे सायबर पोलिसांचे म्हणणे आहे.

सानपाडा येथील रहिवासी असलेल्या नीता तानपुरे (४४) या एका फार्मा कंपनीत सीनिअर अकाउंटंट म्हणून काम करतात. कंपनीत तरुण गुप्ता आणि राजेश गुप्ता संचालक आहेत. १५ एप्रिल रोजी अनोळखी क्रमांकावरून संदेश आला. तरुण गुप्ता यांचा फोटो डीपीला पाहून संचालकांचा संदेश समजून त्यांनीही प्रतिसाद दिला. संदेशात ते तरुण गुप्ता असून, नवीन क्रमांक सेव्ह करण्यास सांगितले. १६ एप्रिल रोजी गुप्ताच्या नावाने आलेल्या संदेशात एका पार्टीला ॲडव्हान्स  पेमेन्ट करायचे असल्याचे सांगून खात्यात किती पैसे आहेत? अशी विचारणा केली. त्यांनीही विश्वास ठेवून १ कोटी २९ लाख रुपये असल्याचे स्क्रीनशॉट पाठवले. त्यानंतर तरुणाने पार्टीचे डिटेल्स देत खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यांनी तरुण यांना कॉल केला; मात्र, तो कॉल कट करण्यात आला. त्यावेळी दोन्ही डायरेक्टर ऑफिसमध्ये उपस्थित होते. मात्र, ते कामात व्यस्त असल्याने कॉल कट करीत असावेत, असे समजून त्यांनी कुठलीही विचारणा न करता सव्वा कोटी सायबर भामट्याला पाठवले. संचालकाला खात्यातून पैसे गेल्याचा संदेश येताच भुवया उंचावल्या. चौकशी केली तेव्हा, भामट्याला पैसे गेल्याचे स्पष्ट होताच खळबळ उडाली. सायबर पोलिस तपास करीत आहेत.

अमेरिकेतील नणंद समजून ३ लाखांचा गंडा

अमेरिकेत राहणाऱ्या नंदेच्या नावाने आलेल्या संदेशाला बळी पडून ६० वर्षीय आजीने ३ लाख गमावले. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

संचालक समजून ३० लाख भामट्याला

वांद्रेमध्ये कंपनीचे संचालक समजून  अकाउंटंटने सायबर भामट्याला ३० लाख रुपये पाठवले. या प्रकरणी सायबर पोलिसांत अनोळखी सायबर भामट्याविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मेलची बनवाबनवी...

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, मॅन इन द मिडलमध्ये दोघांच्या संभाषण किंवा डेटा ट्रान्सफरमध्ये व्यत्यय आणतात. हुबेहूब बनावट आयडी तयार करून फसवणूक करतात. या हल्ल्यात, मधला सहभागी दोन वैध सहभागींपैकी कोणालाही अज्ञात असलेल्या संभाषणात फेरफार करून फसवणूक करतो.

अशावेळी, कंपनीची टेक्नॉलॉजी वेळोवेळी अपडेट तसेच सुरक्षित करावी. ज्या कंपनीशी व्यवहार करण्यात येतो त्या कंपनीच्या योग्यतेबाबत शहानिशा करूनच करार करा. करारामध्ये ईमेल आयडी व बँक डिटेल्स याची दुहेरी खात्री करूनच व्यवहार करा. कराराव्यतिरिक्त ईमेल आयडी व बँक डिटेल्समध्ये अचानक बदल केले गेले तर संबंधित कंपनीबरोबर व्यवहारापूर्वी खात्री करा.

बँक व्यवहारांदरम्यान ईमेल आयडी, बँक खाते क्रमांक याबाबत योग्य ती खातरजमा करा. फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर हेल्पलाइन संपर्क साधण्याचे आवाहन गुन्हे शाखेने केले आहे.

थांबा आणि विचार करा

तुम्हालाही असा संदेश आल्यास थोडे थांबा आणि खातरजमा केल्याशिवाय कुठलेही व्यवहार करू नका. आपण नेमके कुणाशी बोलत आहोत? कुणाला पैसे पाठवत आहोत? याबाबत वेळीच सतर्क होणे गरजेचे असल्याचे सायबर पोलिसांचे म्हणणे आहे.

अशी करतात फसवणूक

एखाद्या बड्या कंपनीचे आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या अधिकाऱ्याला अनोळखी व्हॉट्सॲप क्रमांकावरून संदेश प्राप्त होतो. कंपनीचा मालक/ संचालक/ व्यवस्थापक आहे. हा माझा नवा मोबाईल नंबर आहे. मी सध्या एका महत्त्वाच्या बैठकीत व्यस्त आहे.

आपल्या कंपनीच्या एका प्रकल्पासाठी रक्कम दिलेल्या बँक खात्यात वळती करा. संबंधित व्हॉट्सॲप क्रमांकाच्या डीपीवर मूळ व्यक्तीचे छायाचित्र आणि नाव असते. त्यामुळे अधिकाऱ्याचा विश्वास बसतो, पैसे वळते करतो. पुढे या चौकशी होते तेव्हा तसे आदेश मूळ मालक, वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेले नसतात, हे उमगते.

Web Title: ‘Hello, this is my new number…’ An unknown message emptied many people’s bank accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.