हॅलो, मी आर. बी.आय मधून बोलतोय? सावध व्हा!
By Admin | Updated: November 21, 2014 22:50 IST2014-11-21T22:50:10+5:302014-11-21T22:50:10+5:30
मी आर.बी.आय बँकेच्या एटीएम विभागातून अमित मिश्रा बोलतोय... तुमचा एटीएम नंबर तसेच खाते नंबर दुस-या खातेदाराच्या नंबरला गेले असून कृपया तुमची माहिती सांगा

हॅलो, मी आर. बी.आय मधून बोलतोय? सावध व्हा!
डहाणू : मी आर.बी.आय बँकेच्या एटीएम विभागातून अमित मिश्रा बोलतोय... तुमचा एटीएम नंबर तसेच खाते नंबर दुस-या खातेदाराच्या नंबरला गेले असून कृपया तुमची माहिती सांगा असे सांगून डहाणू येथील एका गरीब वडापाव विक्रेत्याच्या स्टेट बँक आॅफ इंडीयाच्या खात्यातून तब्बल ६५ हजारांची आॅनलाईन शॉपिंग करून एका अज्ञात भामट्याने फसवणूक केल्याप्रकरणी वाणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे डहाणू, पालघर, बोईसर, वानगांव इ. परिसरात अशा पद्धतीने अनेक जणांची फसवणूक होत असून या भागात सायबर सेलची शाखा सुरू करण्याची मागणी होत आहे.
डहाणू येथील हातगाडीवर वडापाव विकून उदरनिर्वाह करणाऱ्या सुनिता राम अवतार सविता (४०) याचे येथील स्टेट बँक आॅफ इंडीयाच्या शाखेत बचत खाते आहे. मूळ उत्तरप्रदेशचे रहिवासी असलेल्या सुनिताने घर बांधण्यासाठी दररोज बचत करून पैसे जमा केले होते. परंतु २० नोव्हेंबर (गुरूवार) रोजी दुपारी ८७५७३२३५१३ या मोबाईल वरून सुनिताला फोन आला. यावेळी सुनिताने आपल्या पती राम अवतार यास मोबाईलवर बोलायला दिले. यावेळी समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने मी अमित मिश्रा बोलतोय तुमचे एटीएम व खाते नंबर मध्ये गोंधळ झाल्याचे सांगून राम अवतार कडून एटीएमचा पीन नंबर, खाते नंबर, एटीएमकार्ड नंबर तसेच इतर माहिती घेऊन मोबाइलवर सतत दोन तास बोलत राहीला.
दरम्यान राम अवतार यास संशय आल्याने तो ताबडतोब स्टेट बँकेच्या धा. डहाणू येथे शाखेत गेला. तिथे चौकशी केल्यावर समोरील फोन करणाऱ्या व्यक्तीने चौदा वेळा आॅनलाईन शॉपिंग करून सुनिता राम अवतारच्या खात्यातून ६५ हजार लंपास केले. विशेष म्हणजे आॅनलाईन शॉपिंगकेल्यानंतर खातेधारकांला मोबाईलवर मॅसेज येतो परंतु सुनिताला एक ही मॅसेज आला नाही त्यामुळे आपली कुणीतरी फसवणूक केल्याचे समजल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. डहाणूत ही तिसरी घटना असून या भागात सायबर सेलची स्थापना करून आरोपीचा शोध घेणे गरजेचे असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)