हॅलो लीड....वानखेडेवर मुंबईतील एकालाच मंत्रिपदाची शपथ

By Admin | Updated: October 29, 2014 22:08 IST2014-10-29T22:08:15+5:302014-10-29T22:08:15+5:30

वानखेडेवर मुंबईतील एकालाच मंत्रिपदाची शपथ

Hello Lead .... One of the ministers in Mumbai on Wankhede | हॅलो लीड....वानखेडेवर मुंबईतील एकालाच मंत्रिपदाची शपथ

हॅलो लीड....वानखेडेवर मुंबईतील एकालाच मंत्रिपदाची शपथ

नखेडेवर मुंबईतील एकालाच मंत्रिपदाची शपथ
विनोद तावडे ठरणार पहिले राजकीय फलंदाज
राहुल रनाळकर / मुंबई
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित सरकारच्या शपथविधी सोहळ्यात मुंबईतील केवळ एकाच आमदाराची वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत भारतीय जनता पार्टीतील सूत्रांनी दिले आहेत. बोरीवलीतून विधानसभेवर तब्बल ७९ हजारांच्या मताधिक्क्याने निवडून गेलेले विधान परिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते विनोद तावडे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचे तूर्तास तरी स्पष्ट झाल्याने मुंबईतील ते पहिले मंत्री ठरतील. त्यामुळे क्रिकेटमुळे मुंबईतून जगभरात पोहोचलेल्या खेळाडूंनंतर मुंबईकर तावडे हे पहिले राजकीय फलंदाज ठरतील, असेच म्हणावे लागेल.
मंत्रिपदाच्या शर्यतीत मुंबईतील अनेक दिग्गज आसुसलेले असताना पहिली संधी कोणाला मिळणार, याकडे अवघ्या मुंबईकरांचे लक्ष लागलेले होते. कारण टीम देवेंद्रच्या पहिल्या फळीत मान मिळावा, यासाठी सर्वच आजी-माजी आमदारांनी चांगलीच फिल्डिंग लावलेली आहे. मुंबई प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार, ज्येष्ठ आमदार प्रकाश मेहता, कुलाब्यातील आमदार राज पुरोहित यांनी आपापल्या पद्धतीने यासाठी चांगलाच जोर लावला आहे. असे असताना सर्वांना बाजूला सारुन तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने मंत्रिपदाची शपथ घेण्यात बाजी मारल्याचेच समजते.
विशेष म्हणजे वानखेडे स्टेडियमवर शपथविधीचा कार्यक्रम हे पहिले सरकार आहे. त्यामुळे या सोहळ्यात मुंबईकरालाही मान मिळावा, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. कारण हे मैदान अनेक मुंबईकर खेळाडूंनी गाजवले आहे. तसेच सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीचा सोहळा असो वा वर्ल्ड कपचे जेतेपद असो, हे मैदान अशा अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार राहिले आहे. त्यामुळे भाजपच्या नव्या राजकीय फलंदाजीची ओपनिंगही मुंबईकर आमदाराच्या सहभागाने व्हावी, अशी मुंबईकरांना वाटत असतानाच तावडे यांच्या नावाने ही ईच्छा पूर्ण झाल्याचे भाजप सूत्रांनी सांगितले.
विधानपरिषदेेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून पक्षाची भूमिका बजावताना विनोद तावडे यांनी प्रस्थापित सरकारला अस्वस्थ केले होते. प्रत्येक अधिवेशनात त्यांनी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला होता. त्यामुळे पक्षात त्यांची प्रतिमा गेल्या काही वर्षांत उंचावली होती. याच कारणास्तव तसेच कोअर कमिटीचे सदस्य असल्याने त्यांची मंत्रिपदी वर्णी लागल्याचे कळते.
मुंबईतील आणखी किमान ३-४ आमदार मंत्री होणार हे निश्चित आहे. पण शिवसेनेसोबतच्या बातचीत अजून अंतिम टप्प्यात पोहोचलेली नाही. त्यामुळे शिवसेनेला किती मंत्रिपदे द्यावी लागतील, याचा अजूनही पुरता अंदाज भाजप नेत्यांना आलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या कोअर कमिटीतील चार सदस्य ३१ तारखेला मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. कोअर कमिटी व्यतिरिक्त एक आदिवासी समाजाचा आमदार तसेच एक अल्पसंख्य समाजाचा आमदारही मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आता पुढच्या टप्प्यात मुंबईतील कोणत्या आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

Web Title: Hello Lead .... One of the ministers in Mumbai on Wankhede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.