Join us  

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये 'रेड अलर्ट'; पुढचे तीन दिवस धुवाधार पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 2:17 PM

रायगड आणि रत्नागिरी जिल्हयांना रेड अर्लट : मुसळधार पाऊस कोसळणार

मुंबई : गुजरात आणि लगतच्या परिसरातील हवामान बदलासह अरबी समुद्रातील हवामान बदलामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आता तर ३ जुलै रोजी रत्नागिरी जिल्हयाला आणि ४ जुलै रोजी रायगड जिल्हयाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या दोन्ही जिल्हयात त्या त्या दिवशी मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. 

राज्याच्या किनारी  भागासह संपुर्ण महाराष्ट्रात पुढील पाच दिवस ठिकठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला असतानाच ३ आणि ४ जुलै रोजी मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. ४ जुलै रोजी पालघर आणि ठाणे येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. तर  रायगडमध्ये देखील ३ आणि ४ जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा येथे ३, ४ आणि ५ जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. या व्यतीरिक्त रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  पूर्व उत्तर प्रदेशमध्ये ३, ४ आणि ५ जुलै रोजी बहुतांशठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पडेल. पश्चिम मध्य प्रदेशात ४ आणि ५ जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. पूर्व मध्य प्रदेशात ३, ४ आणि ५ जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा  आहे. 

मुंबई शहर आणि उपनगरावर रुसलेल्या वरुण राजाने अखेर सोमवारी रात्री ९ ते १२ या वेळेत दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबईसह पश्चिम उपनगर व पूर्व उपनगरातील काही भागात दमदार हजेरी लावली होती. विजांचा कडकडाट आणि सुरु झालेल्या पावसामुळे मान्सून आपली सुरुवातीची कसर भरून काढतो की काय? असे चित्र निर्माण झाले असतानाच सोमवारी रात्री १२ नंतर सर्वत्र पावसाचा जोर ओसरला. मात्र तरिही सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत कुलाबा वेधशाळेत १०१ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाल्याने अखेर दाखल झाल्यानंतर अनेक दिवसांनी मान्सूनने मुंबईत शंभरी गाठल्याचे चित्र होते. दरम्यान, जून २०२० मध्ये महाराष्ट्रात मराठवाड्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली. यामध्ये औरंगाबाद, बीड, जालना, लातूर तर अहमदनगरसह सोलापूरचा समावेश आहे.  

टॅग्स :मानसून स्पेशलपाऊसमुंबईठाणेपालघररायगड