Join us  

मुंबईकरांची सकाळ जोर‘धार’ पावसाने; मंगळवारची रात्रही मुसळधारच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 1:10 AM

मंगळवारी रात्री पावासाचा जोर पुन्हा वाढला़ मुंबईत ७० मिमि पावसाची नोंद झाली़ पावसाचा जोर अचानक वाढल्याने चाकरमन्यांचे मात्र हाल झाले़

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, मंगळवारी पहाटेपासून मुंबईसह लगतच्या परिसरात मुसळधार पाऊस पडला. सकाळी ८ ते १० या वेळेत पावसाने चांगलाच जोर धरला होता.

दुपारनंतर मात्र त्याचा जोर ओसरला. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा रिमझिम पाऊस पडला. दरम्यान, मुंबईत २३.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.पाऊस कोसळत असतानाच पडझडीच्या घटनाही घडल्या. शहरात एका ठिकाणी छताचा भाग कोसळला. ६ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले, तर पश्चिम उपनगरात एका ठिकाणी झाड कोसळले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. दरम्यान, दादर पश्चिम येथील शिल्प सदन या ठिकाणी तळमजला अधिक तीन मजली बांधकाम असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील छताचा काही भाग सोमवारी संध्याकाळच्या सुमारास कोसळला. यात दोघांना किरकोळ मार लागला. सचिन जैसवाल आणि हिमांशु जैसवाल अशी त्यांची नावे आहेत. खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत आतापर्यंत १०४.०७ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

मंगळवारी रात्री पावसाचा जोर पुन्हा वाढला़ मुंबईत ७० मिमी पावसाची नोंद झाली़ पावसाचा जोर अचानक वाढल्याने चाकरमान्यांचे मात्र हाल झाले़ आधीच कोरोनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत़ त्यात अवकाळी पडणाऱ्या या पावसामुळे साथीचे रोग बळावत आहेत़त्याचा नाहक त्रास मुंबईकरांना होत आहे़ त्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावतो़ खड्ड्यांचे प्रमाणही वाढले आहे़मंगळवारी रात्री पावासाचा जोर पुन्हा वाढला़ मुंबईत ७० मिमि पावसाची नोंद झाली़ पावसाचा जोर अचानक वाढल्याने चाकरमन्यांचे मात्र हाल झाले़. राम मंदिर आणि दहिसर भागात सकाळी 8.30 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत 143 mm आणि 89 mm पाऊस कोसळला. मंगळवारी रात्री ९ वाजल्यापासून सांताक्रुझ वेध शाळेत १०६.६ मिमी पावसाची नोंद झाली. तर सकाळी ८ वाजल्या पासून १२८.२ मिमी पावसाची नोंद झाली. मंगळवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत मुंबई शहरात ७३.५२, पूर्व उपनगरात २७.८७ आणि पश्चिम उपनगरात ७८.६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दादर, धारावी, वडाळा, महालक्ष्मी, कुलाबा, चेंबूर, कुर्ला, मालाड, मालवणी, कांदिवली, अंधेरी, वांद्रे, वर्सोवा, पार्ले येथे मुसळधार पावसाची नोंद झाली. हिंदमाता, गांधी मार्केट, मालाड सब वे, अंधेरी मार्केट सब वे येथे पाणी साचल्याने बेस्ट बसची वाहतूक वळविण्यात आली होती.

टॅग्स :पाऊस