Join us  

उष्णतेच्या लाटांनी महाराष्ट्र होरपळला; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पारा ४५ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 3:36 AM

अकोल्यातील तापमान हे मोसमातील सर्वाधिक ठरले. नवतपाचा ताप असाच सुरू राहिला तर यंदा सर्वोच्च तापमानाचा ‘रेकॉर्ड’ मोडीत निघण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई/नागपूर : उष्णतेच्या तीव्र लाटेने देशासह संपूर्ण महाराष्ट्र होरपळून गेला आहे. सोमवारचा दिवस हा विदर्भवासीयांची परीक्षा घेणाराच ठरला. अकोल्यात ४७.४ एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. उपराजधानी नागपूरचे तापमान ४७ अंशांवर गेले असून विदर्भातील इतर जिल्ह्यांचे तापमान ४६ अंशांच्या पुढे होते. मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी तापमान ४५ अंशांच्या घरात होते.

अकोल्यातील तापमान हे मोसमातील सर्वाधिक ठरले. नवतपाचा ताप असाच सुरू राहिला तर यंदा सर्वोच्च तापमानाचा ‘रेकॉर्ड’ मोडीत निघण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, हवामान खात्यातर्फे नागपुरात २७ मेपर्यंत तापमानाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.नागपूरसह इतर शहरांत सोमवारी पारा वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने अगोदरपासूनच वर्तविला होता. त्यानुसार सकाळपासूनच वातावरणातील दाहकता जाणवायला लागली होती. दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत तर उष्ण वाऱ्यांमुळे अक्षरश: भाजणी होत होती.विदर्भात जवळपास सर्वच मुख्य ठिकाणी पारा ४५ अंशांहून अधिक होता.

उत्तर भारतातही उष्णतेची लाट

राजस्थानमध्ये बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ४७ अंश नोंदविण्यात आले आहे. उत्तर भारतासह पंजाब, हरयाणा, राजस्थान, दिल्ली येथे मोठ्या प्रमाणावर उष्णतेच्या लाटा वाहत आहेत. बिहार, झारखंड, पश्चिम बंगालही भाजून निघाला आहे.

26 ते २७ मे : विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल.28 मे : विदर्भात उष्णतेची लाट येईल.

टॅग्स :तापमानमहाराष्ट्र