मुंबई : छातीत होणारी जळजळ सामान्य वाटत असली तरी ती आरोग्यदृष्ट्या गंभीर इशारा ठरू शकते. त्यामुळे या लक्षणांकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
छातीत निरनिराळ्या कारणांमुळे जळजळ होऊ शकते. पचनक्रियेच्या संस्थेशी विकार निर्माण झाल्यानंतर अन्न पचन नीट न झाल्यास ॲसिडिटीमुळेही छातीत जळजळ होते. त्यामागे गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स आजार (जीईआरडी) कारणीभूत असू शकतो.
छातीच्या मध्यभागी जळजळ होऊ शकते. ही जळजळ अँटीसिडची औषधे घेतल्याने थांबते. मात्र, काही व्यक्तींना हृदयविकार असल्यानेही छातीत जळजळ होऊ शकते, त्यामुळे वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा.
काय काळजी घ्याल?
आहार आणि जीवशैलीत बदल करणे आवश्यक.
वेळेवर आहार घेणे आणि झोपणे
जेवल्यानंतर काही तासांनी झोपावे
अतिखाणे टाळणे काय आहे जीईआरडी?
गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स या आजारात छातीत मध्यभागी जळजळ सुरू होऊन, ती घसा आणि मानेपर्यंत पसरते. अन्ननलिकेतून ॲसिड वरच्या भागात येते. त्यामुळे जळजळ जाणवत असते.
हृदयविकाराचाही धोका
अनेकवेळा हृदयविकाराचा झटका आल्यामुळेही छातीत जळजळ आणि वेदना होतात. त्यामुळे छातीतील जळजळीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
निदान कसे कराल?
छातीत जळजळ ही मूलभूत समस्या आहे. तेलकट, तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर ॲसिडिटीचा त्रास जाणवतो, त्यानंतर जळजळ सुरू होते.
लक्षणे काय?
छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे, छातीत वेदना होणे, अस्वस्थ वाटणे, खाण्याची इच्छा न होणे, काही वेळा उलट्या होणे
आमच्या ओपीडीमध्ये दिवसाला ॲसिडिटी, जीईआरडीएच्या तक्रारींचे २० ते ३० रुग्ण येतात. या आजाराचे योग्य पद्धतीने निदान करणे आवश्यक असते. कारण कधी कधी छातीत होणारी जळजळ हृदयविकारही असू शकतो. त्यामुळे चांगल्या फिजिशियनचा सल्ला घ्या. तसेच एकाच वेळी जास्त खाऊ नका, दिवसातून चार वेळा थोडे थोडे खा. भरल्यापोटी तत्काळ झोपू नये. जेवणाच्या वेळा पाळा, आयुष्याला एक शिस्त लावून घ्या. अवेळी खाण्याने पोटाचे विकार वाढीस लागतात.
डॉ. प्रवीण राठी, पोटविकार विभागप्रमुख, नायर रुग्णालय.